Bodybuilding : बोरीवलीत रंगणार ‘खासदार श्री’
५ लाखांचे इनाम असल्याने विजेतेपदासाठी चुरशीचा संघर्ष अपेक्षित
मुंबई :
केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीयुष गोयल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धा’ (Bodybuilding Competition) उद्या, रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) बोरीवली पश्चिम येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात पार पडणार आहे. यंदाच्या शरीरसौष्ठव (Bodybuilding) हंगामाची सुरुवात करणारी ही स्पर्धा ५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसांमुळे मुंबईतील दिग्गज शरीरसौष्ठवपटूंना (Bodybuilding) आकर्षित करत आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईतील शरीरसौष्ठवाची (Bodybuilding) खरी संपत्ती क्रीडाप्रेमींना एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी खेळाडू तासनतास वर्कआऊट करत असून, त्यांच्या पीळदार बायसेप्स, ट्रायसेप्स, छाती, शोल्डर्स आणि बारीक नसांचे जाळे (ॲब्ज आणि बॅक मसल्स) पाहण्यासाठी शरीरसौष्ठवप्रेमींचा (Bodybuilding) जनसागर उसळेल, असा विश्वास आयोजकांना आहे.

Bodybuilding स्पर्धेसाठी लाखमोलाचा संघर्ष
खासदार श्री स्पर्धेसाठी मुंबईतील १५० हून अधिक खेळाडू रिंगणात उतरणार आहेत. हरमीत सिंग, नीलेश दगडे, निलेश रेमजे आणि उमेश गुप्ता यांच्यासारखे नामांकित खेळाडू या पीळदार पोझ-युद्धाचा थरार दाखवतील. स्पर्धेतील ‘खासदार श्री’ विजेत्याला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. उपविजेत्याला ५० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला २५ हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोवरील अशा एकंदर सात वजनी गटात खेळवली जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे १०, ८, ६, ५ आणि ४ हजार रुपये रोख पुरस्कार दिले जातील. या स्पर्धेत फिजीक फिटनेसचे दोन गट आणि महिला शरीरसौष्ठवाचाही एक गट समाविष्ट आहे, अशी माहिती खासदार श्री स्पर्धेचे संयोजक आणि निमंत्रक कुणाल केरकर यांनी दिली.
संघटकांची मेहनत
शरीरसौष्ठवपटूंना मालामाल करणाऱ्या या स्पर्धेला खासदार गोयल यांचा मोलाचा हातभार लाभला आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी स्पर्धेची भव्यता डोळे दिपवणारी असेल, अशी ग्वाही दिली.



