Cancer : राज्यात नागरिकांना मिळणार त्रिस्तरीय कर्करोग सेवा
मुंबई :
राज्यातील कर्करोग रुग्णांना सर्वसमावेशक आणि सुलभ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने सूचवलेल्या ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेल’च्या आधारे राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा सुरू होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने यासाठी धोरण निश्चित केले आहे. दरम्यान, या योजनेमुळे कर्करोग रुग्णांना जिल्ह्यातच उपचार मिळणार आहेत. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
पहिल्या स्तरावर टाटा कर्करोग रुग्णालय शिखर संस्था म्हणून कार्य करणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ प्रशिक्षण, मनुष्यबळ निर्माण आणि संशोधन यावर भर दिला जाईल. दुसऱ्या स्तरात नऊ मोठी केंद्रे समाविष्ट केली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, अमरावती, मुंबईतील जे.जे. रुग्णालय आणि पुण्याचे बी.जे. मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये कर्करोग शिक्षण, तपासण्या आणि उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय, दुसऱ्या स्तरावरील रुग्णालयांमध्ये एमडी, एएस, डीएम, एमसीएच, डीएनबी फेलोशिपसारखी उच्च शिक्षण पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. भविष्यातील उपचारांची गरज पाहता या केंद्रांचे रूपांतर पहिल्या स्तरातील संस्थांमध्येही करण्यात येऊ शकते.
तिसऱ्या स्तरावर निदान, किमोथेरपी, डे-केअर रेडिओथेरपी अशा सुविधा देण्यात येणार आहेत. अंबाजोगाई, यवतमाळ, जळगाव, रत्नागिरी, सातारा, बारामती, ठाणे आणि शिर्डी संस्थानची रुग्णालये या स्तरावर कार्यरत राहतील. या केंद्रांची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने केली जाणार असून पूर्ण नियंत्रण शासनाकडेच असेल.
महाकेअर फाउंडेशनची स्थापना
या संपूर्ण प्रकल्पासाठी ‘महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन’ (महाकेअर फाउंडेशन) स्थापन केले जाणार आहे. ही संस्था मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करेल. मनुष्यबळ नियोजन, व्यवस्थापन आणि PPP धोरणाची अंमलबजावणी या संस्थेमार्फत केली जाईल. सर्व समन्वयासाठी सिंगल क्लाऊड कमांड अँड कंट्रोल सिस्टम उपलब्ध असेल.
Cancer : विविध माध्यमातून होणार उपलब्ध निधी
निधी उभारणीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत राखीव निधीतून १०० कोटी रुपये दैनंदिन भांडवल म्हणून उपलब्ध होणार आहेत. तसेच चाचण्या, CSR, देणग्या आणि जागतिक आर्थिक संस्थांकडूनही निधी मिळवण्याचा मार्ग खुला आहे. ही त्रिस्तरीय सेवा कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील कर्करोग रुग्णांना जवळच्या जिल्ह्यातच उच्च दर्जाची उपचार सुविधा मिळणार असून, कर्करोग व्यवस्थापनात महाराष्ट्र मोठी झेप घेणार आहे.



