New Year : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स्, बारची होणार तपासणी

अटींचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर केली जाणार सक्त कारवाई

मुंबई :

नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स्, आस्थापना, गृहसंकुल व इमारती, समुद्र किनाऱयावर व अन्य ठिकाणी कार्यक्रम, स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्ती यांचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे.

दोन दिवसांपूर्वी गोव्यातील एका नाईट क्लबला आग लागून अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह मुंबई अग्निशमन दल सज्ज आहे. आगीच्या घटना घडू नये यासाठी व्यापक जनप्रबोधन केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात, यासाठी मुंबई अग्निशमन दल सतत प्रयत्नशील असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

नववर्ष तयारी
नववर्ष तयारी

नियमित होणाऱ्या अग्निसुरक्षा तपासणी व्यतिरिक्त मुंबई अग्निशमन दलाकडून गतवर्षी देखील विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीम अंतर्गत मुंबईतील विविध इमारती, हॉटेल, मॉल्स आदींसारख्या संभाव्य गर्दीच्या ७३१ आस्थापना / ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यातील अग्निसुरक्षेविषयक अटी व उपाययोजनांचे अनुपालन न केल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार १२ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. परिणामी अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या नाहीत.

या वर्षी देखील मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईतील विविध रेस्टॉरंटस्, हॉटेल्स्, बार, पब, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल्स्, जिमखाने, बँक्वेट हॉल्स्, अतिगर्दी होणारे मॉल्स्, तारांकित हॉटेल्स् यासारख्या आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी २२ ते २८ डिसेंबर २०२५ या ७ दिवसांत करण्यात येणार आहे. ज्या आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्तींचे पालन केले नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे, असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले. 

New year : चौपाट्यांवर सज्ज असणार बोटी व जीवसंरक्षक

नववर्षाच्या पूर्वसंध्येस सुरक्षेविषयक उपाययोजना म्हणून विविध समुद्रकिनाऱ्यावरील चौपाट्यांवर देखील जीवरक्षक, बोटी व जीवसंरक्षक साधने यासह मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी किंवा आग लागल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवून जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम ३ (१) नुसार आपल्या इमारतीमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे दायित्व संबधित मालक/भोगवटादार यांचे आहे.

अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे आस्थापनांना बंधनकारक

सदर अधिनियमाच्या कलम ३ चे पोटकलम (३) प्रमाणे इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवानाधारक अभिकरणाकडून कलम ३ (३) व नियम ४ (२) नुसार सहामाही प्रमाणपत्र वर्षातून दोनदा “नमुना ब” प्रमाणे जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक आहे. अशा परवानाप्राप्त अभिकरणांची यादी ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळावर (www.mahafireservice.gov.in) उपलब्ध आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. रवींद्र अंबुलगेकर यांनी कळविले आहे.

हेही वाचा : New Year : मुंबईतले हॉटेल्स, बार एफडीएच्या वॉचलिस्टवर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *