केळेवाडी bridge होणारच; सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही – मंगल प्रभात लोढा
गिरगावकरांच्या हक्कांसाठी आंदोलनात सहभाग

मुंबई :
गिरगावकरांच्या दैनंदिन सुविधांवर परिणाम करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. चर्नी रोड ते केळेवाडी पूल पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ठाम भूमिका कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी मांडली. सैफी हॉस्पिटलसमोर गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.
पत्रकारांशी बोलताना लोढा यांनी सैफी हॉस्पिटल प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्नी रोड ते केळेवाडी दरम्यान पूल व्हावा, यासाठी गेली तीन वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही अनेक बैठका झाल्या. महापालिकेकडून पुलाला मान्यता मिळून निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, सैफी हॉस्पिटलने न्यायालयात धाव घेतल्याने कामाला अडथळा निर्माण झाला.

न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेत महापालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. त्यानंतर पुलाचे काम सुरू झाले असून सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप लोढा यांनी केला.
स्थानिकांना पूर्वसूचना न देता bridge चे काम
स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुलाचे काम थांबवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लोढा यांनी महापालिका मुख्यालयात सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांची भेट घेऊन जाब विचारला. मात्र लोढा यांना समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही दबावाला बळी न पडता महापालिकेने तातडीने पुलाचे काम पुन्हा सुरू करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा : उदयोन्मुख प्रतिभेसाठी IIM MUMBAI देणार प्रगत डिजिटल शिक्षण
जोपर्यंत केळेवाडी पूल पूर्ण होत नाही, तोपर्यंत गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून लढा सुरूच राहील, असा निर्धार मंत्री लोढा यांनी आंदोलनानंतर व्यक्त केला.


