Vacant Post : मे २०२६ पर्यंत रिक्त होणारी पदे भरण्यास मंजुरी
शिक्षक भरतीबाबत शासनाचा शाळांना मोठा दिलासा
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळांमधील मे २०२६ पर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये या वर्षात होणारी रिक्त पदे तातडीने भरली जाण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीच्या या निर्णयामुळे राज्यातील शाळा व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत ८० टक्क्यांपर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ मधील निकालाच्या आधारे ही पदभरती करण्यात येते. दरवर्षी सेवानिवृत्ती व संचमान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतूदीनुसार शाळांतील पदे १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
Vacant Post भरल्याने शिक्षक टंचाई कमी होण्यास मदत होणार
नवीन शासन निर्णयानुसार, संबंधित शाळांच्या संचमान्यतेनुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाअखेर संभाव्य रिक्त होणारी पदे गृहीत धरून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक टंचाई कमी होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



