CET Exam : बी.एड., तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रम नोंदणी सुरू
मार्च–एप्रिलमध्ये होणार परीक्षा
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. (इलेक्टिव्ह) तसेच ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस गुरुवारपासून सुरुवात झाली. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आतापर्यंत एमपीएड, एमएड, एमसीए, एम.एचएमसीटी, बी.एड आणि ३ वर्षीय एलएलबी अशा सहा अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थांना २३ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. बी.एड. आणि एलएलबी ३ वर्ष सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बी.एड. सीईटी परीक्षा २७ ते २९ मार्च तर विधी ३ वर्ष परीक्षा १ ते २ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. उर्वरित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी नोंदणीसही लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांसाठीचा ऑनलाईन अर्ज, सविस्तर माहिती पुस्तिका आणि नोंदणीचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांनी माहिती पुस्तिकेतील पात्रतेचे निकष, आरक्षण नियम, आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा पद्धती काळजीपूर्वक वाचावीत, असे आवाहनही सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे. बीएड तसेच ३ वर्षीय एलएलबी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतली जाणार आहे.
२०२५ च्या बी. एड. सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये तब्बल १ लाख १६ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर ३ वर्षीय विधी सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर यंदा नोंदणीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थांनी तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी बंधनकारक
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेचत्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने यावर्षी पासून सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार)आयडी व दिव्यांग विद्यार्थ्याना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी ) बंधनकारक करण्यातआला आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोदणी करावी लागणार आहे. यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्यापत्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
हेही वाचा : मुंबईमध्ये ‘ Marathi ’चा जागर की केवळ २५ वर्षे राजकीय वापर?
सीईटी नोंदणी
बी.एड. सीईटी
- नोंदणी प्रारंभ : ८ जानेवारी
- नोंदणी अंतिम : २३ जानेवारी
- सीईटी : २७ मार्च ते २९ मार्च
एलएलबी (३ वर्षीय) सीईटी
- नोंदणी प्रारंभ : ८ जानेवारी
- नोंदणी अंतिम : २३ जानेवारी
- सीईटी : १ ते २ एप्रिल



