Langadi Game : अमर हिंदच्या मैदानात ‘लंगडी’चा थरार
ज्ञान विकास विद्यालय, ठाणे ठरले 'महाविजेते'
मुंबई :
दादरच्या ‘अमर हिंद मंडळा’चा शालेय क्रीडा महोत्सव दणक्यात सुरु आहे. कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय लंगडी स्पर्धेने दादरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अटीतटीच्या लढतीत आपल्या चपळाईच्या आणि धोरणी खेळाच्या जोरावर ज्ञान विकास विद्यालय, ठाणे या संघाने मुले आणि मुली अशा दोन्ही गटांत वर्चस्व गाजवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यस्तरीय खेळाडू श्री. निकेश धुरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले, तर पारितोषिक वितरण समारंभात प्रसिद्ध दंतचिकित्सक आणि ॲथलेटिक्स खेळाडू डॉ. मनोज मुगुदुम (BDS, MDS) यांची उपस्थिती खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली.

ज्ञान विकास विद्यालयाच्या झंझावातापुढे श्री गणेश विद्यालयचा पराभव
मुलींच्या अंतिम सामन्यात ज्ञान विकास विद्यालय, ठाणे विरुद्ध श्री गणेश विद्यालय, वडाळा (मराठी माध्यम) यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. ज्ञान विकास विद्यालयाने श्री गणेश विद्यालयावर २७-१६ असा ११ गुणांनी विजय मिळवला. एकेकाळी तगड्या असलेल्या श्री गणेश विद्यालयाला हा पराभव जिव्हारी लागला. ज्ञान विकासच्या समृद्धी कदम (१ मि. संरक्षण व ६ गुण), रेणूका कंक (०३ गुण) आणि श्रावणी मोरे (१.५०, १ मि. . संरक्षण व ५ गुण), यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रत्युत्तरात पराभूत श्री गणेश विद्यालयाच्या आर्या खोपटकर (१, १:३० मि. संरक्षण), पलक गाणेकर (१:३० मि. संरक्षण व २ गुण), आणि रेहा पोरदुरी (०५ गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

मुले गट : ज्ञान विकासची २ गुणांनी बाजी
मुलांचा अंतिम सामना अत्यंत थरारक झाला. ज्ञान विकास विद्यालय, ठाणे विरुद्ध सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप या सामन्यात प्रत्येक मिनिटाला उत्कंठा वाढत होती. शेवटी ज्ञान विकास विद्यालयाने सह्याद्री विद्यामंदिरचा २७-२५ असा २ गुणांनी पराभव केला. ज्ञान विकासच्या साईराज बैलकर (७ गुण), श्रेयस धनावडे (२ गुण), सार्थक सकपाळ (२ गुण) आणि साहिल शिंदे (१.२०, १.२० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तर पराभूत सह्याद्री विद्यामंदिरच्या मयुरेश घागरूम (१:२० मि. संरक्षण व ५ गुण), अनय तावडे (१:२० मि. संरक्षण), श्रेयस शिंदे (१:२० मि. संरक्षण व ६ गुण) आणि यश कदम व प्रज्योत गुजर (प्रत्येकी १:२० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली.
दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला Langadi पारितोषिक सोहळा
या क्रीडा महोत्सवाचे आकर्षण म्हणजे उपस्थित मान्यवर! मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित डॉ. मनोज मुगुदुम यांनी विजेत्यांचे कौतुक करताना खेळाडूंच्या जिद्दीला दाद दिली. एकूण २३ शाळांनी (मुली – १२, मुले – ११) या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. उद्घाटन प्रसंगी श्री. निकेश धुरी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. अमर हिंद मंडळाच्या या यशस्वी आयोजनामुळे मुंबईतील शालेय क्रीडा संस्कृतीला पुन्हा एकदा नवी उभारी मिळाल्याचे दिसून आले.



