Medical : पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २४५ जागांना मान्यता

महाराष्ट्रात सर्वाधिक जागा वाढल्या; तिसऱ्या फेरीत होणार जागांचा समावेश

मुंबई :

वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाच्या (एमएआरबी) निर्णयाविरोधात वैद्यकीय महाविद्यालयांनी केलेल्या अर्जानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) अतिरिक्त १७१ पदव्युत्तर वैद्यकीय जागांना मंजुरी दिल्यानंतर आता पुन्हा २४५ जागांना मान्यता देण्यात आली आहे. एनएमसीच्या प्रथम अपील समितीच्या मंजुरीमुळे अनेक राज्यांमध्ये तसेच प्रमुख अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पीजी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. या जागांचा समावेश तिसऱ्या फेरीमध्ये करण्यात येणार असल्याचे एनएमसीकडून जाहीर करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये एमएआरबीने मंजूर केलेल्या जागांच्या निर्णयाविरोधात काही वैद्यकीय महाविद्यालयांनी एनएमसी अधिनियम, २०१९ च्या कलम २८(५) अंतर्गत अपील केले होते. या अपीलाबाबत प्रथम अपील समितीने विचारविमर्श करून २४५ जागांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी या समितीने १७१ जागांना मंजुरी दिली होती. या मंजूर पदव्युत्तर जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे लेटर ऑफ परमिशन (एलओपी) लवकरच जारी करण्यात येणार आहे. समुपदेशन प्रक्रियेत या जागांचा समावेश करण्यासाठी समुपदेशन प्राधिकरणांनी संस्थांकडून एलओपीची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली ही यादी समुपदेशन प्रक्रियेसाठी वैध म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना सर्वाधिक जागावाढ मिळाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ५३, तेलंगणा ४१, राजस्थानमध्ये २६, बिहारमध्ये २१ उत्तर प्रदेशमध्ये १६, दिल्लीला १४ जागा मंजूर झाल्या आहेत. महाराष्ट्रात सोलापूर, नागपूर, सांगली, अमरावती, नवी मुंबई आणि जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांना विविध अभ्यासक्रमांत अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेषतः जनरल मेडिसिन, रेडिओ डायग्नोसिस, जनरल सर्जरी, डर्मेटोलॉजी आणि पेडियाट्रिक्स या अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. एनएमसीच्या या निर्णयामुळे देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे. आगामी समुपदेशन प्रक्रियेत या वाढीव जागांचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, पदव्युत्तर प्रवेशासाठीची स्पर्धा काही प्रमाणात सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Medical च्या या अभ्यासक्रमांच्या वाढल्या जागा

सामान्य वैद्यकशास्त्र ६२, रेडिओ निदानशास्त्र ३९, शस्त्रक्रिया शास्त्र ३०, त्वचारोग, लैंगिक रोग व कुष्ठरोग ३०, बालरोगशास्त्र २२, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र ११, अस्थिरोगशास्त्र ९, कान-नाक-घसा रोगशास्त्र ९, नेत्ररोगशास्त्र ६, मानसोपचारशास्त्र ५, भूलशास्त्र ४, श्वसनरोगशास्त्र ४, किरणोपचार ऑन्कोलॉजी ३, आपत्कालीन वैद्यकशास्त्र ३, जैवरसायनशास्त्र २, कौटुंबिक वैद्यकशास्त्र २, समाजवैद्यकशास्त्र २, सूक्ष्मजीवशास्त्र २ अशा २४५ जागा वाढल्या.

हेही वाचा : BMC निवडणुकीत ‘डिजिटल वॉर’, भाजपची आघाडी, विरोधकांकडे मतदारांची पाठ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *