PG Medical : पात्रता निकष बदलणार; तिसरी फेरी रखडणार
मुंबई :
पदव्युत्तर (पीजी) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी जागांमध्ये वाढ झाली असताना, पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) घेतला आहे. सुधारित टक्केवारी पात्रता निश्चित होईपर्यंत समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीचे अखिल भारतीय कोटा तसेच राज्यस्तरीय वेळापत्रक जाहीर करण्यात येणार नाही. परिणामी तिसऱ्या फेरीसाठी जवळपास ४१६ जागा वाढल्या असल्यातरी ही फेरी रखडणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सुधारित निकषांमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने (एमएआरबी) मंजूर केलेल्या जागांच्या निर्णयाविरोधात काही वैद्यकीय महाविद्यालयांनी एनएमसी अधिनियम, २०१९ च्या कलम २८(५) अंतर्गत अपील केले होते. या अपीलाबाबत प्रथम अपील समितीने विचारविमर्श करून ४१६ जागांना दोन टप्प्यात मंजुरी दिली. या मंजुरीमुळे वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर प्रवेश क्षमतेत वाढ झाली. या जागांचा तिसऱ्या फेरीमध्ये समावेश होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे तिसरी फेरी कधी जाहीर होते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र एमसीसी तिसऱ्या फेरीसाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुधारित टक्केवारी पात्रता निश्चित होईपर्यंत पीजी समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीचे अखिल भारतीय कोटा तसेच राज्यस्तरीय वेळापत्रक जाहीर केले जाणार नसल्याचे एमसीसीकडून देशातील सर्व आरोग्य सेवा महासंचालनालय, वैद्यकीय शिक्षण संचालक, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांना कळविण्यात आले आहे.
पीजी समुपदेशन २०२५ साठी राउंड-३ मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारित टक्केवारी पात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच एमसीसीकडून अखिल भारतीय कोटा आणि राज्य समुपदेशनाचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तोपर्यंत कोणत्याही राज्याने स्वतंत्रपणे पीजी समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. एमसीसीकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच राज्यस्तरीय समुपदेशनाला गती मिळणार असून, सर्व राज्यांनी केंद्राच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही एमसीसीकडून करण्यात आले आहे.
PG प्रवेश प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक
एमसीसीच्या निर्देशामुळे राज्यांतील पीजी प्रवेश प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागणार आहे. विद्यार्थ्यांना एमसीसीकडून अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तिसरी फेरी रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुधारित निकष पात्रतेचा निर्णय हा देशातील पीजी वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याने, समुपदेशन प्रक्रियेत एकसंधता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.



