Tata Mumbai Marethon : रिलायन्स हॉस्पिटल वैद्यकीय भागीदार

मुंबई :

मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठेच्या क्रीडा उपक्रमांपैकी एक असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ साठी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (एचएनआरएफएच) यांची अधिकृत वैद्यकीय भागीदार म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी रुग्णालयाने व्यापक आणि अत्याधुनिक वैद्यकीय तयारी केली असून, धावपटूंच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

मॅरेथॉनच्या संपूर्ण मार्गावर धावपटूंना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रुग्णालयाकडून सुसज्ज वैद्यकीय यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. धावण्याच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी १५ हून अधिक वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, त्याठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी उपलब्ध असतील. तसेच मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, १० किमी धावणे, ड्रीम रन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतींच्या समाप्तीस्थळी तीन पूर्ण सुसज्ज वैद्यकीय बेस कॅम्प कार्यरत असतील. दिव्यांग आणि ज्येष्ठ धावपटूंसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार आणि रुग्णालयात हलविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १८ हून अधिक एसीएलएस (Advanced Cardiac Life Support) सुसज्ज रुग्णवाहिका, मार्गावर ठरावीक अंतरावर उभ्या राहणार असून, मोटारसायकलवरून फिरणारे १५ पेक्षा अधिक डॉक्टर धावपटूंना जलद मदत देण्यासाठी सज्ज असतील. स्ट्रेचर आणि व्हीलचेअरने सुसज्ज स्थलांतर पथके फिनिश लाईन आणि होल्डिंग एरियामध्ये तैनात असतील.

Tata marethon मध्ये  १०० हून अधिक प्रशिक्षित स्पॉटर्स धावपटूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार

या संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेसाठी मार्गनकाशाचे बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. प्रवेश व निर्गमन मार्ग, रुग्णवाहिकांसाठी विशेष कॉरिडॉर, जवळची रुग्णालये आणि आपत्कालीन स्थलांतर मार्ग निश्चित करण्यात आले असून, कंट्रोल रूमद्वारे रिअल-टाइम समन्वय साधला जाणार आहे. याशिवाय स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर व बीएलएस प्रशिक्षण, स्पर्धकांसाठी डिजिटल आरोग्य सल्ला आणि पेसर्सना थेट कंट्रोल रूमशी संपर्काची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर १०० हून अधिक प्रशिक्षित स्पॉटर्स धावपटूंच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवणार आहेत.

या भागीदारीबाबत बोलताना सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचे सीईओ डॉ. तरंग गियानचंदानी यांनी सांगितले की, “मुंबई मॅरेथॉन ही शहराच्या ऊर्जेचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे. प्रत्येक सहभागी सुरक्षित राहावा यासाठी आमची सर्वोत्तम वैद्यकीय क्षमता वापरण्याचा आमचा संकल्प आहे.” प्रोकॅम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग यांनीही या सहकार्यामुळे स्पर्धेतील सुरक्षितता आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. या सहकार्यामुळे टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये धावपटूंच्या सुरक्षिततेसह जागतिक दर्जाची वैद्यकीय तयारी अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राचे पुरुष–महिला KHO-KHO संघ उपांत्य फेरीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *