आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल; Budget विकासाला नवी गती देणारा – मंगलप्रभात लोढा
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत उभारणीच्या दिशेने देश वाटचाल करत असताना सादर करण्यात आलेला २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा त्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक बळकटीसाठी दिशा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री लोढा म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग देत ७.४ टक्के विकासदर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून भारताला जागतिक पातळीवरील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या श्रेणीत आणण्यासाठी या अर्थसंकल्पातून प्रयत्न दिसून येतात. मध्यमवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि शेतकरी यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. शेती क्षेत्रात बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून आधुनिक शेती पद्धतींना चालना देण्याचा निर्णयही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बायो फार्मा मिशन’च्या माध्यमातून औषधनिर्मिती क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे. यामुळे औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासोबतच भारताला जागतिक औषध उत्पादन केंद्र म्हणून बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Budget मध्ये शिक्षण क्षेत्रालाही प्राधान्य
शिक्षण क्षेत्रालाही प्राधान्य देत पाच नवीन विद्यापीठे आणि तीन आयुर्वेद महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक भारतीय वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार जागतिक स्तरावर होण्यास मदत होईल. डिजिटल आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देण्यासाठी ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची योजना असून १५ हजार माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये या लॅब उभारल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना तांत्रिक व डिजिटल कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याची घोषणा उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती देत देशभर सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे या शहरांचा या प्रकल्पात समावेश असल्याने महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि शेती क्षेत्राला त्याचा फायदा होईल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. तरुणांना रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आणि एमएसएमई क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सहा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये बदल करण्याचा संकल्पही या अर्थसंकल्पातून दिसतो.
हेही वाचा : Saint George’s Hospital : अनधिकृत झोपड्या हटविल्याने शवागृहाचा मार्ग मोकळा
शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून सादर केलेला हा अर्थसंकल्प देशाला विकसित राष्ट्राच्या दिशेने नेणारा ठरेल, असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.



