अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ KHO-KHOचा धडाका

पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका व बँक ऑफ इंडियाची विजयी घोडदौड!

मुंबई :

मुंबईतील खो-खो प्रेमींसाठी सध्या दादरमधील कै. अजितदादा पवार क्रीडा नगरी हेच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने अमर हिंद मंडळ आयोजित कै. उमेश शेणॉय स्मृती चषक पुरुष व महिला व्यावसायिक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत खेळाडूंनी वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि जिद्दीचे अप्रतिम दर्शन घडवले आहे. महिला आणि पुरुष गटातील साखळी सामन्यांत पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बँक ऑफ इंडिया यांनी दमदार विजय नोंदवत विजेतेपदासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.

पश्चिम रेल्वेचा मुंबई पोलिसांवर दणदणीत विजय voice of eastern
पश्चिम रेल्वेचा मुंबई पोलिसांवर दणदणीत विजय

महिला गट : पश्चिम रेल्वेचा मुंबई पोलिसांवर दणदणीत विजय

महिला गटातील साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर २२–१३ असा ५.४० मि. राखून ०९ गुणांनी विजय मिळवला. विजयी पश्चिम रेल्वेच्या कल्याणी कंक (नाबाद १ मि. संरक्षण व ६ गुण), अर्चना माजी (३.३० मि. संरक्षण), निसार के एम (नाबाद १.३०, २.५० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (३.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दमदार खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या पायल पवार (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), श्रेया सनगरे (२ मि. संरक्षण), अंजली कनोजिया (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), दिक्षा सोनसुतकर (२ गुण) यांनी चांगली झुंज दिली, मात्र विजयापासून दूर राहिल्या. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

महिला गट : पश्चिम रेल्वेचा महावितरण कंपनीवर एकतर्फी धुव्वा

महिला गटातील साखळी सामन्यात पश्चिम रेल्वेने महावितरण कंपनीचा २५–०२ असा १ डाव व २३ गुणांनी एकतर्फी पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. विजयी पश्चिम रेल्वेच्या अर्चना माजी (५.४० मि. संरक्षण व ४ गुण), किशोरी मोकाशी (नाबाद १.२० मि. संरक्षण), कल्याणी कंक (६ गुण), शिवानी धोत्रे (४ गुण), संध्या सुरवासे (४ गुण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना संधीच दिली नाही. पराभूत महावितरण कंपनीच्या मनाली काजारे (१ मि. संरक्षण), मिना कांबळे (१.३० मि. संरक्षण), देविका अहिरे (१.४० मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले, मात्र पश्चिम रेल्वेच्या भक्कम आक्रमणासमोर त्यांचा निभाव लागला नाही. या सामन्यावर संदीप केदार यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

पुरुष गट : बँक ऑफ इंडियाचा रचना नोटरी वकर्सवर नाट्यमय विजय

या सामन्यात रचना नोटरी वकर्सने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले, मात्र बँक ऑफ इंडियाने २५–२३ असा २ गुणांनी थरारक विजय मिळवला. विजयी बँक ऑफ इंडियाच्या जर्नादन सावंत (१, नाबाद २.०६ मि. संरक्षण व २ गुण), विजय देठे (२.२५ मि. संरक्षण व ६ गुण), सुजल जायगडे (२.५६ मि. संरक्षण व ६ गुण), राज सकपाळ (४ गुण) यांनी सलग प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. पराभूत रचना नोटरी वकर्सच्या प्रथमेश दुर्गावळे (२, १.४० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार मिरगळ (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), रुपेश कोंढाळकर (१.१५ मि. संरक्षण व ४ गुण), भावेश बने (१.५०, १.१० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढा दिला. या सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

पुरुष गट : मुंबई महानगरपालिकेची मुंबई पोलिसांवर विजयी झेप

या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाणेफेक जिंकून आक्रमण स्वीकारले आणि मुंबई पोलिसांवर २८–२६ असा २ गुणांनी विजय मिळवला. विजयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्जुन अनिवासे (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), संचित कंक (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), पियुश घोलम (१.२० मि. संरक्षण व ८ गुण), अजय मित्र (१ मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाके (१, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट खेळ करत विजय निश्चित केला. पराभूत मुंबई पोलिसांच्या आकाश हजारे (२ मि. संरक्षण व २ गुण), अक्षय खापरे (२.१०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत देसाई (१, १.५० मि. संरक्षण व ४ गुण), हनुमंत जगताप (६ गुण) यांनी शेवटपर्यंत जोरदार प्रतिकार केला. या सामन्यावर गणेश गवंडी यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले.

स्पर्धेची रंगत शिगेला : व्यावसायिक KHO-KHO चा नवा इतिहास घडतोय

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक ‘डायनॅमिक’ खो-खो स्पर्धेत प्रत्येक सामना अधिक चुरशीचा आणि रोमांचक होत असून, खेळाडूंच्या उत्कृष्ट कौशल्याने अजितदादा पवार क्रीडा नगरी अक्षरशः दणाणून गेली आहे. वेगवान खेळ, अचूक बचाव आणि आक्रमणाच्या जोरावर संघ विजेतेपदासाठी झुंज देत असून, ही स्पर्धा खो-खोच्या व्यावसायिक युगाचा नवा अध्याय लिहित आहे.

हेही वाचा : आधार-अपार प्रमाणीकरणाशिवाय आता CET नोंदणी शक्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *