मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर golf courseसाठी अभ्यास करण्यास बीएमसीची परवानगी
गोल्फ कोर्स प्रस्तावित करणारे मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी बीएमसीच्या निर्णयाचे केले स्वागत
मुंबई :
बीएमसीने आज प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) यांना मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथे गोल्फ कोर्सच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी (feasibility study) परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, यामुळे मुलुंडच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून आर्थिक विकास होण्याबरोबरच जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचाही मार्ग सुकर होणार आहे.

बुधवारी बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथे गोल्फ कोर्सच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी Professional Golf Tour of India (PGTI) ला परवानगी देणारे पत्र दिले. मुलुंड कचरा भूमीवर गोल्फ कोर्स उभारण्याची मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनीच केली होती.
मुलुंडकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि बीएमसी आयुक्त भूषण गगराणी जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. अनेक वर्षे मुलुंड पूर्वेतील नागरिकांना या डंपिंग ग्राऊंडमुळे येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागला. २०१८ मध्ये हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आले. गेल्या वर्षी संपूर्ण कचरा हटविल्यानंतर उपलब्ध असलेल्या ६४ एकर जमिनीवर बीएमसीने गोल्फ कोर्स विकसित करावे, अशी मागणी मी केली होती, असे आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.
आमदार मिहीर कोटेचा पुढे म्हणाले की, मे महिन्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंडमधील विविध प्रश्नांवर बैठक घेतली होती. त्यावेळी मी गोल्फ कोर्स बांधण्याची मागणी पुन्हा मांडली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत व्यवहार्यता अभ्यास करण्याचे निर्देश दिले, असेही आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.
Golf Course उभारल्यास मुलुंडच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल
मुलुंड कचराभूमीवरून कचरा हटवल्यानंतर मुलुंडकरांना शुद्ध हवा मिळेल, असे नमूद करताना आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, गोल्फ कोर्स उभारला गेल्यास संपूर्ण मुलुंडच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. पुनर्विकासात अडकलेल्या जुन्या इमारती आणि वसाहतींनाही थेट फायदा होईल. गोल्फ कोर्समुळे परिसराच्या आर्थिक विकासात भर पडेल. मुलुंडकरांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त वातावरण मिळेल. तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.


