BMC : कामगार, कर्मचाऱ्यांचे मार्चचे संपूर्ण वेतन कापले

३० हजारांपासून ९० हजारांपर्यंत वेतन कापल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

मुंबई :

कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील परिचारिका, कर्मचारी यांचे मार्चमध्ये संपूर्ण वेतनच कापण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे ३० ते ५० हजार रुपये वेतन कापण्यात आले आहे, तर परिचारिकांच्या हातामध्ये वेतनाच्या फक्त १० ते २० टक्के रक्कम मिळणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कापण्यात आलेले वेतन त्वरित न दिल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कर्मचारी व परिचारिकांकडून देण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव, कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच १६ उपनगरीय रुग्णालयामधील परिचारिका व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील वेतन मोठ्या प्रमाणात कापण्यात आले आहे. वेतन १ तारखेला होत असले तरी कर्मचारी व परिचारिकांना काही दिवस अगोदरच ऑनलाईन वेतन पावती मिळते. त्यानुसार २५ मार्च रोजी मिळालेल्या वेतन पावतीनुसार सर्व कर्मचारी व परिचारिकांचे मोठ्या प्रमाणात वेतन कापण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन हे संगणकीय सॅप प्रणालीद्वारे काढण्यात येते. तांत्रिक कारणे, बाह्य कर्तव्य, निवडणूक कर्तव्य, रजा या कारणांसाठी संगणकीय प्रणालीत नोंद करणे आवश्यक असते. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या मानव संसांधन विभागाकडून सर्व विभाग प्रमुखांना वारंवार नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कर्मचारी व परिचारिकांच्या उपस्थितीची योग्य नोंदी वेळेवर संगणकीय प्रणालीत नोंदवल्या नाहीत. परिणामी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपये तर जवळपास एक लाख रुपयांच्या आसपास वेतन असलेल्या या परिचारिकांना वेतनातून ९० हजार रुपये बेकायदेशीररित्या कापण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका voice of eastern
मुंबई महानगरपालिका

संपूर्ण महिना काम करूनही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे वेतन कापल्याने या कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहेत. मार्चमध्ये घरखर्च कसा चालवायचा, घराचे हफ्ते, मुलांचे शिक्षण, आजारपण, दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्यासमाेर निर्माण झाला आहे. पाऊस असो, ऊन असो, महामारी असो, पूरस्थिती असो अथवा युद्धस्थिती असो मुंबई महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी नित्यनेमाने कर्तव्य बजावत असतात. मात्र प्रशासनाच्या गलथानपणामुळे वेतन कापण्यात आल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अनैसर्गिक कपातीला तातडीने स्थगिती द्या

महापौर, उप महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि महापालिका आयुक्त यांनी याबाबतीत तातडीने हस्तक्षेप करुन कामगार, कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२६ च्या वेतनात होणाऱ्या अनैसर्गिक कपातीला तातडीने स्थगिती द्यावी. तसेच परिपत्रकीय आदेशांची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना मर्यादित कालावधीची संधी देणे आवश्यक असल्याची विनंती दि म्युनिसिपल युनियन सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.

तातडीने वेतन न दिल्यास आंदोलन करू

वेतनातून कोणतीही रक्कम कापायची असल्यास एक महिना आधी तशी सूचना देण्याची मागणी यापूर्वी आयुक्तांनी मान्य केली होती. तसेच वेतन अधिदान कायद्यामध्ये तरतूद ही आहे, तरीही रुग्ण सेवा सातत्याने करत असताना, कायम सेवा देणाऱ्या परिचारिकांचे वेतन कापणे अन्यायकारक आहे. कापलेले वेतन त्वरित न दिल्यास परिचारिकाना आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व मुंबई मनपा कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे निमंत्रक ॲड प्रकाश देवदास यांनी दिला आहे.

BMC कर्मचाऱ्यांना भूर्दंड का?

एएनएम प्रलंबित राहण्यास कर्मचारी जबाबदार नसून आस्थापना जबाबदार आहे. त्यामुळे कापण्यात आलेले वेतन याच महिन्यात अदा करावे, जेणेकरून कामगार कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, अशी विनंती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे.

हेही वाचा :  University : ग्रामीण रोजगाराला चालना देणाऱ्या दोन खाजगी विद्यापीठांना मान्यता – मंगलप्रभात लोढा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *