CET Exam : सीईटी आजपासून सुरू
एमपीएडच्या परीक्षेपासून होणार सुरुवात
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेला २४ मार्च २०२६ पासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा १६ मेपर्यंत चालणार असून, ५४ दिवसांमध्ये १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पदव्युत्तर शारीरिक शिक्षण (एमपीएड) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेपासून सुरुवात होत आहे. यावर्षी १७ लाख ६३ हजार विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार आहेत.

राज्यातील १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली अर्ज नोंदणी प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे. तर बीबीए, बीसीए, बीएमएस या अभ्यासक्रमांसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया २५ मार्चपर्यंत सुरू आहे. आतापर्यंत या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून १३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील पीसीबी, पीसीएम व एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच सीईटीच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या तिन्ही अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी दोन्ही संधी मिळून १३ लाख ४६ हजार १६१ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. तर सर्व १७ अभ्यासक्रमाचे आजपर्यंत दोन्ही सीईटी मिळून एकूण १७ लाख ६३ हजार ६५३ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. तसेच २०२५ मध्ये १४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेला नोंदणी केली होती. तर १२.४७ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा दिली होती. या १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला २४ मार्चपासून सुरुवात होत आहे.
एमपीएड अभ्यासक्रमासाठी २५२५ विद्यार्थी CET देणार
सीईटीची सुरुवात एमपीएड या अभ्यासक्रमाने होणार आहे. एमपीएड या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी २ हजार ५२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये १ हजार ७८० पुरुष व ७४५ महिला आहेत. या वर्षीच्या नोंदणीमध्ये १९ अनाथ विद्यार्थीही एमपीएडची प्रवेश परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी एमपीएड सीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये २ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी मागील वर्षीपेक्षा १४१ विद्यार्थी अधिक प्रवेश परीक्षा देणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी संगणकाधारित पद्धतीने राज्यातील १८ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. याची क्षेत्रीय चाचणी ऑफलाईन पद्धतीने २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

