Exam : यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या परीक्षा १६ जानेवारीनंतर घ्या
शिक्षक संघटनेची मागणी
मुंबई :
मुंबई महानगर प्रदेशातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. या निवडणुकांसाठी विविध शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहेत. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त मानसिक व प्रशासकीय ताणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी २०२६ मधील नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या मुंबई महानगर प्रदेशातील काही महानगरपालिकांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. बहुतांश महाविद्यालयांमधील शिक्षकांची निवडणुक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जानेवारी २०२६ च्या परीक्षा ७ ते २२ जानेवारी या कालावधीत होत आहेत. यातील सत्र १ ते सत्र ३ च्या परीक्षा या ७ ते १७ जानेवारीदरम्यान होत आहेत. तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका या १५ जानेवारी रोजी असल्याने शिक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. निवडणूक कर्तव्य व नियोजित परीक्षा यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर मानसिक व प्रशासकीय ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच १६ जानेवारीनंतरच सर्व नियोजित परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Exam तणावमुक्त घेण्याला प्राधान्य द्या
निवडणूक कर्तव्य हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक शासकीय जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर एकाच वेळी परीक्षा व निवडणूक या दोन्ही जबाबदाऱ्या टाकणे अन्यायकारक आहे. याचा थेट परिणाम परीक्षा नियोजन, गुणवत्तेवर व कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावावर होतो. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक तणावमुक्त व पारदर्शक होईल, संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले. याबाबत संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधण्यात आला असून, योग्य तो निर्णय अपेक्षित आहे. निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



