BMC निवडणुकीत ‘डिजिटल वॉर’, भाजपची आघाडी, विरोधकांकडे मतदारांची पाठ

मुंबई : 

भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्ह्णून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १५ व्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. २२७ प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत यंदा रॅली, सभा आणि होर्डिंगबाजीपेक्षा डिजिटल प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आकर्षक दृश्यात्मक मांडणीच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने डिजिटल आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपच्या प्रचाराची सर्वाधिक चर्चा होत आहे ती ‘मार्व्हल’ सिनेमॅटिक युनिव्हर्सवर आधारित एआय-जनरेटेड व्हिडिओंमुळे. आयर्न मॅन, थानोस, स्पायडरमॅन, हल्क यांसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय पात्रे मुंबईच्या नागरी प्रश्नांवर भाष्य करताना दाखवण्यात आली आहेत. रस्ते, पायाभूत सुविधा, विकासकामे आणि भविष्यातील योजनांच्या संदर्भात हे व्हिडिओ सादर करण्यात आल्याने ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. विशेषतः १८ ते २५ वयोगटातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये या प्रचारामुळे उत्सुकता वाढल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रचारासोबतच भाजपने एकसंध आणि ठोस संदेश देण्यावर भर दिला आहे. “त्यांच्या भूलथापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही” ही घोषणा प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्म, पोस्टर आणि बॅनरवर सातत्याने वापरली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या जुन्या प्रचार शैलीचा संदर्भ घेत त्याच नरेटिव्हला उलटवण्याची रणनीती भाजपने अवलंबल्याचे दिसते. त्यामुळे विरोधक प्रचारात बचावात्मक भूमिकेत गेल्याचे मत काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) गटाकडून ‘कोस्टल रोड’सारख्या प्रकल्पांचे श्रेय घेण्यावर भर दिला जात आहे. मात्र, अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प, तसेच मागील प्रशासनाच्या काळातील कामांचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नांबाबत मतदारांमध्ये साशंकता असल्याचे चित्र आहे. शहरातील राजकीय चर्चांमध्ये या ‘श्रेयवादाच्या’ राजकारणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत.

BMC प्रचार थेट मतदारांच्या मोबाईलपर्यंत

आजच्या काळात ‘अटेंशन इकॉनॉमिक्स’ महत्त्वाची ठरत असताना भाजपने लांबलचक भाषणांऐवजी लहान, सहज शेअर करता येणारा आणि लक्षात राहणारा डिजिटल कंटेंट तयार केला आहे. इन्स्टाग्राम रील्स, व्हॉट्सॲप स्टेटस आणि युट्यूब शॉर्ट्सच्या माध्यमातून प्रचार थेट मतदारांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांचा पारंपरिक प्रचार तुलनेने फिका पडत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आता केवळ रस्ते, नालेसफाई किंवा पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही लढाई ‘नरेटिव्ह’ची बनली असून, आधुनिक तंत्रज्ञान, तरुण पिढीची भाषा आणि भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन यांवर निवडणुकीचे गणित ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :  मुंबईचा कायापालट : देवेंद्र फडणवीस यांचा Mumbai साठी ‘मास्टर प्लॅन’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *