Election : उबाठा मनसेचे मराठी विभागांवर लक्ष्य
मुंबई :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठीच्या मुद्यावर एकत्रित आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) आणि मनसेने शहर आणि उपनगरातील मराठी विभागांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. मराठी बहुल विभागांमध्ये मतांचे विभाजन आणि पराभव टाळण्यासाठी जागा वाटपामध्ये जिंकणाऱ्या जागांवर तडजोडीची भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे. महापालिकेत अधिकाधिक जागा जिंकण्याची रणनीती दोन्ही पक्षांकडून आखण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. काँग्रेसने स्वबळाची नारा दिल्याने महायुतीसाठी निवडणूक सोपी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातच मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
Election मध्ये नराठी मतांसाठी मनसे आणि उबाठाची तयारी सुरु
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर राज्यासह मुंबईतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. उबाठा गटातील बहुतांश नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने यामध्येही निवडणुकीत मराठी मते विभागणार आहेत. सोबतच भाजप, काँग्रेस या पक्षांना मानणारा मराठी वर्गही मोठा असल्याने अधिकाधिक मराठी मते मिळविण्यासाठी मनसे आणि उबाठा गटाने तयारी सुरु केली आहे. तिकीट वाटपामध्ये जिंकणारे उमेदवार पाहून तिकीट वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वरळी, लालबाग, परळ, दादर, माहीम अशा वर्चस्व असलेल्या शहर आणि उपनगरातील ठिकाणांवरही लक्ष्य केंद्रित केले आहे. अधिकधिक जागा कशा पदरात पडतील यासाठी दोन्ही पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. धारावीतील १८८ मतदारसंघात मनसेची ताकद नसताना उमेदवारी देण्यात येत असल्याबद्दल पक्षातील नेत्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



