wrestling : देशातील बलाढ्य कुस्ती राज्यांचा मुंबईत ‘मुकाबला’

२६ जानेवारीला ‘कुस्ती महादंगल २०२६’मध्ये दिग्गज पैलवानांची रणधुमाळी

मुंबई :

देशातील कुस्तीप्रेमींसाठी अभिमानाचा आणि इतिहास घडवणारा क्षण मुंबईत साकारत आहे. पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच मैदानात आमनेसामने येणार असून, हा थरारक महासंग्राम ‘कुस्ती महादंगल २०२६’च्या रूपाने साजरा होणार आहे.

अर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि सध्या मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून, नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य एकदिवसीय कुस्ती स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राम
मुंबईत पहिल्यांदाच कुस्तीचा महासंग्राम

चार राज्ये… चार संघ… एकच विजेता!

या स्पर्धेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब ही देशातील कुस्तीची बलाढ्य राज्ये सहभागी होत असून प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला असे एकूण ७ पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

चार राज्यांची wrestling संघ पुढीलप्रमाणे :

  • मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र) :
    पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट),
    रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.
    महिला : अमृता पुजारी, सोनाली महाडिक
  • शेर-ए-पंजाब (पंजाब) : 
    करणदीप (पंजाब केसरी),
    संदीप मान, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.
    महिला : प्रियंका सिकरवार, शिवानी
  • हरियाणा शूर (हरियाणा) :
    अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.
    महिला : कुसुम दहिया, मोनी गुर्जर.
  • यूपी योद्धा (उत्तर प्रदेश) :
    अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.
    महिला : प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.

मान्यवरांची उपस्थिती, दिग्गजांचा सन्मान

या ऐतिहासिक स्पर्धेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच जागतिक स्तरावर चमकलेल्या कुस्तीपटूंचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे म्हणून…

“मुंबईत कुस्तीला व्यापक आणि व्यावसायिक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कुस्ती लीगच्या धर्तीवर या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथूनच उद्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, हा आमचा विश्वास आहे. भविष्यात देशातील प्रत्येक राज्याचा संघ या महादंगलचा भाग असेल, असे आयोजक नरसिंह यादव म्हणाला.

कुस्तीप्रेमींना आवाहन

या ऐतिहासिक ‘कुस्ती महादंगल २०२६’ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्तीच्या या महासंग्रामाचा थरार अनुभवावा, असे आवाहन नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांनी केले आहे.

हेही वाचा : MMC Election : २३ जानेवारीपर्यंत नोंदणी अद्ययावत करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *