heatstroke चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
आवश्यक औषधे, उपाययोजना करण्याचे रुग्णालयांना निर्देश
मुंबई :
मागील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढल्याने नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, त्यांना निर्जलीकरणाचा त्रास होऊन त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य उष्मघाताच्या घटनांचा सामना करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत.
राज्यामध्ये तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील उष्णतेचा पारा सरासरी ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असून, मुंबईतील पारा ३८ अंश सेल्सियसच्य वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांना निर्जलीकरणाच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे उष्माघाताच्या घटनांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. आरोग्य विभागाने राज्यातील जिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका आरोग्य आधिकारी व मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना संभाव्य उष्मघाताच्या घटनांचा सामना करण्यासाठी अमलबजावणी व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये उष्मघात रुग्णांच्या त्वरित उपचारासाठी शीत खोली सज्ज ठेवण्यात यावी, सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्मघात उपचारासाठी आवश्यक औषध व साहित्य उपलब्धत करण्यात यावीत. यामध्ये औषधे, आय.व्ही.फल्यूईड, ओ.आर.एस. इत्यादींची उपलब्धता तपासून घ्यावी व गरज असल्यास त्वरीत पुरवठा करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना दिले आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळयात तास्त तापमानामुळे आग लागण्याच्या शक्यता असतात. संभाव्य दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे सर्व आरोग्य संस्थांमध्ये विद्युत तपासणी करुन आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात. तसेच सर्व उपकरणांची कार्यक्षमता तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
उष्मघात विषयक वैद्यकीय व्यवस्थापन तसेच आयएचआयपी-एनपीसीसीएचएच पोर्टलवर उष्माघात सर्वेक्षण प्रभावीपणे करण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात यावे. उप्मघाताच्या नियंत्रणासाठी इतर संबधित विभागांशी समन्वय साधून कृती दलाच्या बैठका घेण्यात याव्यात. जनजागृती व आरोग्य शिक्षण उप्मघात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य शिक्षणाबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करावी. वृत्तपत्र, प्रसार माध्यमे, समाज माध्यम इत्यादी प्रसिध्दी माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी.
heatstroke : दुपारच्या वेळी कार्यक्रम टाळा
उन्हाच्या तीव्रतेच्या काळात दुपारच्या वेळी नागरिकांना अधिक त्रास होत असतो. त्यामुळे दुपारच्या काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, तसेच अशा कार्यक्रमांना परवानगीही देऊ नये, अशा सूचना संबंधित प्रशासनाकडून निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.



