KEM Hospital : मुंबई महापालिकेने ‘किंग एडवर्ड’ नाव बदला – मंगलप्रभात लोढा

मुंबई :
एकीकडे मुंबई शहरातल्या लोकल स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याचा निर्णय घेतला जात असतानाच आता मुंबईतील केईएम रुग्णालयाचे किंग एडवर्ड हे नाव बदलता येईल का? याचा विचार मुंबई महापालिकेने करावा, असे मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री लोढा यांनी रुग्णाच्या सेवेसाठी काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले यावेळी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत. केईएम रुग्णालयाचे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतिक आहे. किंग एडवर्डचा आपल्याशी काही संबंध नाही. हे नाव बदलता येईल का याबाबत मुंबई महापालिकेने विचार करावा. यासंदर्भात पुढील निर्णय पालिका प्रशासन घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. याच केईएम रुग्णालयात सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय ही असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी अधोरेखित केले.
KEM मधील रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी एआयचा वापर करा
मंत्री लोढा यांनी रुग्णालय आणि रुग्णांच्या बाबतीत काही सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. काळानुसार आता AI तंत्रज्ञानाचा रुग्णांच्या उपचारासाठी वापर करता आला पाहिजे. एखाद्या विशेष केस संदर्भात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उपचार तात्काळ रुग्णाला मिळावेत यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी जगातल्या अन्य प्रगत तंत्रज्ञानाचे साह्य घेता येईल अशी टेली कम्युनिकेशन व्यवस्था निर्माण करावी. तसेच रुग्णांना एकाच ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी प्रशासनाने आरोग्य सुविधा केंद्र उभारावेत त्यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा मनस्ताप टाळता येईल. रुग्णांचे हेलपाटे होऊ नयेत यासाठी त्यांना त्यांच्या उपचाराची ,औषधांची आणि तपासण्यांची माहिती एकाच वेळी मिळू शकेल यासाठी डिजिटल केंद्रही रुग्णालयात असावीत अशा सूचना मंत्री लोढा यांनी केल्या आहेत. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाबाबतही उपस्थितांना यावेळी माहिती दिली.
हेही वाचा : wrestling : देशातील बलाढ्य कुस्ती राज्यांचा मुंबईत ‘मुकाबला’
केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, सार्वजनिक आरोग्य उपआयुक्त शरद उघडे, संचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. शैलेश मोहिते, लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन इंगळे आणि दक्षिण मुंबई भाजपच्या अध्यक्ष शलाका साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.



