Kho-kho : महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार!

५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी 'मिशन चॅम्पियन' सज्ज!

पुणे :

अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार आहे. महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.

मुंबईमध्ये होणार खो खो स्पर्धा
खो खो स्पर्धा

Kho-kho गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज

भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे.

पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत

कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.

महिला संघ : रणरागिणींचा आत्मविश्वास आणि धार

कर्णधार : रितिका राठोड, अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, संपदा मोरे, मैथिली पवार, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, श्वेता नवले, रितिका राठोड (कर्णधार) (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), सरिता दिवा (नाशिक), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी) या रणरागिणी मैदानात उतरतील. प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : निकिता पवार (धाराशिव), व्यवस्थापिका : सुनिता जायभाय (बीड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मार्गदर्शकांचे बळ, व्यवस्थापनाची ठाम साथ

दोन्ही संघांसोबत अनुभवी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापनाची मजबूत टीम असल्याने तांत्रिक तयारी, डावपेच आणि मानसिक बळ या तिन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सज्ज आहे.

शुभेच्छांचा वर्षाव : सुवर्णमय स्वप्नासाठी एकजूट

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंना सुवर्णमय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : BMC election : मुंबईच्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरून राजकीय वाद; एमव्हीएवर आरोप, तर आघाडीचा नकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *