महाराष्ट्राचे पुरुष–महिला KHO-KHO संघ उपांत्य फेरीत
काझीपेठ (तेलंगणा) :
येथील रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो (KHO-KHO) अजिंक्यपद स्पर्धे मध्ये महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी जबरदस्त खेळ सादर करत उपांत्यपूर्व फेरी सहज पार केली आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि आक्रमक वृत्तीच्या जोरावर महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची संधीच दिली नाही. सामन्यागणिक वाढत गेलेला थरार आणि खेळाडूंची जिद्द पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
उपांत्य फेरीत महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, तर एअरपोर्ट विरुद्ध ओडिसा यांच्यात लढत होणार आहे. पुरुष गटात महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर आणि रेल्वे विरुद्ध ओडिसा हे सामने रंगणार असून, या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला गट : महाराष्ट्राचा पश्चिम बंगालवर ठसा
उपांत्यपूर्व फेरीतील महिला गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर १ डाव १३ गुणांनी (२०–७) मात करत उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), संध्या सुरवसे (नाबाद ४.१० व १.४० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (३.४० मि. संरक्षण), सुहानी धोत्रे (४ गुण) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली. तर पराभूत पश्चिम बंगालकडून दीपिका चौधरी (१.४० मि. संरक्षण), टियासा हेल्डर (१.२० मि. संरक्षण व २ गुण), सुष्मिता दास (१.२० मि. संरक्षण) यांनी प्रतिकार केला.

एअरपोर्ट संघाची मुसंडी; गुजरात पराभूत
महिला गटात एअरपोर्ट अथॉरिटीने (विमान प्राधिकरण) गुजरातचा ३ मिनिटे व ९ गुण (२४–१५) राखून पराभव केला. विमान प्राधिकरणकडून चित्रा बी. (३.३० मि. संरक्षण), स्वाती पाटील (२.३० मि. संरक्षण), वैष्णवी पवार (१.४० मि. संरक्षण व २ गुण) आणि स्नेहा लामकाणे (नाबाद १.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. गुजरातकडून उर्मिला (१ मि. संरक्षण), प्रिया चौधरी (६ गुण), उपासना चौधरी (१.१० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
इतर महिला Kho-Khoचे सामने : ओडिसाची सरशी, दिल्लीचा धक्का
महिला गटात ओडिसाने कर्नाटकचा (२४–२०) ४ गुणांनी पराभव केला. तर बलाढ्य कोल्हापूर संघाला दिल्लीकडून (२७–२५) अवघ्या २ गुणांनी पराभवाचा धक्का बसला.
पुरुष गट : महाराष्ट्राचा आंध्रप्रदेशवर दबदबा
पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर (२३–१६) १ डाव ७ गुण राखून दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राकडून प्रतिक वाईकर (२ व १.२० मि. संरक्षण), सुयश गरगटे (२ मि. संरक्षण), शुभम थोरात (१.५० मि. संरक्षण व ४ गुण), निहार दुबळे (८ गुण), अनिकेत चेंदवणेकर (१.५० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी केली. पराभूत आंध्रप्रदेशकडून के. राम मोहन (१.३० मि. संरक्षण), किरण (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), के. फणी (६ गुण) यांनी झुंजार खेळ केला.
कोल्हापूरचा दिल्लीवर विजय; उपांत्य फेरीत प्रवेश
दुसऱ्या पुरुष सामन्यात कोल्हापूरने दिल्लीचा (३६–२४) १२ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरकडून विजय हजारे (२ व १.२० मि. संरक्षण), अमित पाटील (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), देवेंद्र दिलीप (१.५० मि. संरक्षण), मजहर जमादार (६ गुण), अरणव पाटणकर (६ गुण) यांनी मैदान गाजवले. दिल्लीकडून सुजित (१ व १ मि. संरक्षण), मेहूल (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), राहुल व सुशील कुमार (प्रत्येकी ६ गुण) यांनी लढत दिली.
रेल्वेचा कर्नाटकवर विजय; ओडिसाची आगेकूच
पुरुष गटात रेल्वेने कर्नाटकचा (२३–१५) १ डाव ८ गुणांनी पराभव केला. रेल्वेकडून आदित्य गणपुले (३.४० मि. संरक्षण), महेश शिंदे (३.४० मि. संरक्षण), अभिनंदन पाटील (६ गुण), अरुण गुणकी (१ मि. संरक्षण), अक्षय गणपुले (१.२० मि. संरक्षण) यांनी निर्णायक कामगिरी केली. पराभूत कर्नाटककडून मिराप्पा (१.१५ मि. संरक्षण), जसवंत (१.४० मि. संरक्षण), मनोज कुमार (१ मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रयत्न केले. चौथ्या सामन्यात ओडिसाने केरळचा ३ मिनिटे व ६ गुण (२९–२३) राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली.


