ITI : पीएम – सेतू योजनेअंतर्गत आयटीआयचे होणार आधुनिकीकरण
कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई :
कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील भलीमोठी तफावत दूर करण्यासाठी पीएम- सेतू योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) आधुनिकीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील आयटीआय सर्वोत्तम ‘स्किल डेव्हलमपेंट हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी ‘हब अँड स्पोक’ हे प्रारूप विकसित केले जाणार आहे. या प्रारुपामुळे आयटीआयचे आधुनिकीकरण टप्प्याटप्याने करणे सोपे होणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणामुळे राज्यातील तरुणांना विविध क्षेत्रात उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणाची अमलबजावणी पुढच्या वर्षात टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. राज्यात १ हब आयटीआय व ४ स्पोक आयटीआय यांचा मिळून एका क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. या क्लस्टरसाठी येणाऱ्या खर्चापैकी केंद्र सरकारकडून ५० टक्के, राज्य सरकारकडून ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राकडून १७ टक्के निधी उपलब्ध केला जाणार आहे. एका क्लस्टरसाठी पाच वर्षामध्ये अंदाजित २४१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचे ११२ कोटी रुपये, राज्य सरकारचे ९८ कोटी आणि उद्योग क्षेत्रातून ३१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. या योजनेमुळे यामुळे राज्यातील आयटीआयचे रूपडे पालटण्यास मदत होणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
ITI असे असणार क्लस्टर
नागपूर येथील सरकारी आयटीआय ह नागपूर आयटीआयचे हब असणार आहे. तर मुलींसाठीचे आयटीआय, नागपूर, कामती, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा स्पोक म्हणून समावेश केला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील आयटीआय हब म्हणून असणार आहे, तर पैठण, खुल्ताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचे स्पोक म्हणून आधुनिकीकरण केले जाणार आहे. पुण्यातील औंध येथील आयटीआयचा हब म्हणून विकास करण्यात येणार असून, औंध येथील मुलींसाठीचे आयटीआय, खेड-राजगुरूनगर आणि मुळशी येथील आयटीआयचे स्पोक म्हणून आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
नवीन अभ्यासक्रमासह विद्यमान अभ्यासक्रमातही सुधारणा
उद्योगांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बहुकौशल्य अभ्यासक्रम, सेवा क्षेत्र आणि उपजिविका अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. एका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार तर १० विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारण्यात येणार आहे. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, आठ अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारली जाणार आहे.


