MSRTC : यंदाचा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी थोडा गम’
मुंबई :
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात Maharashtra State Road Transport Corporation (एसटी) साठी काही आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी ती महामंडळाच्या एकूण आर्थिक गरजांच्या तुलनेत अपुरी असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही तरतूद “थोडी खुशी, थोडा गम” अशीच असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस Shrirang Barge यांनी व्यक्त केले.
बरगे यांनी सांगितले की, एसटी हे राज्यातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दळणवळण साधन आहे. मात्र अशा परिस्थितीतही सरकारकडून या महामंडळाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
MSRTC चा भविष्यात सुमारे ८,३०० नव्या बसगाड्या खरेदीचा मानस
प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि एसटीची सेवा मजबूत करण्यासाठी भविष्यात सुमारे ८,३०० नव्या बसगाड्या खरेदी करण्याचा मानस राज्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी व्यक्त केला आहे. तथापि या योजनेसह इतर विकासकामांसाठी किमान ८ हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना अर्थसंकल्पात केवळ २,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे बरगे यांनी नमूद केले.
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठी सुमारे ३ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता असून ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘Ladki Bahin’ : १७ एप्रिलला सिनेमागृहांमध्ये येणार
मात्र दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीच्या रकमा अद्याप संबंधित ट्रस्टमध्ये जमा करण्यात आलेल्या नाहीत. तसेच वाढीव महागाई भत्त्याचाही प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या एसटीवर सुमारे ४,५०० कोटी रुपयांची वैधानिक देणी बाकी असल्यामुळे महामंडळाला अधिक भरीव आर्थिक सहाय्याची गरज असल्याचे बरगे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर किमान पुरवणी मागण्यांमध्ये तरी राज्य सरकारने एसटीसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करावी, अशी मागणीही कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.



