Mumbai University : परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
२३ ते २५ फेब्रुवारीला होणार परीक्षा
मुंबई :
राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाकहून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पुढे ढकललेल्या परीक्षा २३ ते २५ फेब्रुवारी रोजी यापूर्वी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार मतमोजणी ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा व मनुष्यबळ गुंतल्याने ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला होता. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यानुसार ९ आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या अनुक्रमे २४ व २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. सर्व परीक्षांची वेळ ही पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच राहणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळ यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे २८ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेतच घेण्यात येणार आहेत. परीक्षाच्या वेळापत्रकात केलेल्या बदलासंदर्भातील सूचना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचिवण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालये, विद्यापीठ विभाग, ठाणे व कल्याण उपकेंद्र, दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण विभाग (सीडीओई) तसेच संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.



