Mumbai University : खेलो इंडिया स्पर्धेसाठी संघ ठरला पात्र
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठ उपविजेते
मुंबई :
मुंबई विद्यापीठाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल (पुरुष) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. देशभरातील अव्वल विद्यापीठांच्या संघांमध्ये रंगलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेतील उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट समन्वय, बचाव आणि वेगवान आक्रमण यांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर प्रभावी विजय नोंदवला. संघातील खेळाडूंची फिटनेस, व्युहरचना आणि संघभावना यांचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. प्रशिक्षक मंडळाच्या योग्य मार्गदर्शनामुळे संघाने प्रत्येक सामन्यात स्थिरता आणि आत्मविश्वास टिकवून ठेवला.

अंतिम सामना बंगळुरूतील जैन युनिव्हर्सिटी या संघाविरुद्ध अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी पहिल्यापासून आक्रमक खेळ करत प्रेक्षकांना रोमांचित केले. पहिल्या क्वार्टरमध्ये मुंबई विद्यापीठ १५-१४ च्या आघाडीवर, दुसऱ्या क्वार्टरमध्ये ३७-३४ ची आघाडी, तिसऱ्या क्वार्टरला ५२-४८ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जैन युनिव्हर्सिटीने ७१-७५ पॉईंट ने आघाडी घेतली. अखेरपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी झुंजार लढत देत पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस ४ पॉईंट या अल्प फरकाने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा : Shivshaurya saga : मुंबई विद्यापीठाचा ‘उडान’ जल्लोषात
या चमूच्या कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि संचालक क्रीडा व शारिरीक शिक्षण डॉ. मनोज रेड्डी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भविष्यात राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवण्याचा आत्मविश्वास संघाने व्यक्त केला असून, या यशामुळे विद्यापीठातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना चषक आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.



