NCET 2026 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी
मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निवडक केंद्रीय व राज्य विद्यापीठे तसेच आयआयटी, एनआयटी, आरआयई आणि शासकीय महाविद्यालयांमधील चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम (आयटीईपी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षेच्या (एनसीईटी) अर्ज नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना ११ मार्च २०२६ रोजी पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेला चार वर्षीय बी.ए./बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करून त्याचे रुपांतर चार वर्षीय एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रममध्ये (आयटीईपी) करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने (एनसीटीई) २०२५ मध्ये घेतला होता. मात्र गतवर्षी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात आली होती. मात्र यंदापासून आयटीईपी प्रवेशासाठी एनसीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही जबाबदारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे (एनटीए) सोपविण्यात आली आहे. एनटीएच्या नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आयटीईपी हा एकात्मिक अभ्यासक्रम असून पहिला मुख्य विषय ‘शिक्षण’ (विशिष्ट शालेय स्तरातील विशेषीकरणासह) आणि दुसरा मुख्य विषय विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाखेतील असेल. एनसीईटी २०२६ ही परीक्षा देशभरातील १३ माध्यमांमध्ये संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १० मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत करता येणार आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ११ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत भरता येणार आहे. अर्जातील दुरुस्ती १२ ते १४ मार्च २०२६ दरम्यान करता येणार आहे.
NCET परीक्षा १७ एप्रिल २०२६ रोजी होण्याची शक्यता
परीक्षा शहराची माहिती, प्रवेशपत्र डाउनलोड, उत्तरतालिका व नोंदवलेली उत्तरे याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचे जाहीर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार १७ एप्रिल २०२६ रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षेचा निकालही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी https://nta.ac.in/](https://nta.ac.in/ तसेच https://exams.nta.nic.in/ncet/ आणि https://exams.nta.nic.in/ncet/ या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Charni road पुलासाठी सैफी रुग्णालयासमोर आंदोलन; मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी
एनसीईटी २०२६ परीक्षेमध्ये पात्र ठरलेले उमेदवार एनसीईटी मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य विद्यापीठे, आयआयटी, एनआयटी, आरआयई व शासकीय महाविद्यालयांमधील समुपदेशन व प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. रिक्त जागा असल्यास संबंधित संस्था एनसीईटी पात्र उमेदवारांच्या यादीतून त्या भरू शकतील.



