Railway Megablock : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण जलद मार्ग : पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक
मुंबई :
रेल्वे रुळ, सिग्नल प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद,अर्ध-जलद लोकल मार्गावरील सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबतील. या सेवा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद, अर्ध-जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकांवर थांबतील व पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या सेवा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल,एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान ५व्या मार्गावरून वळविण्यात येतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथे येणाऱ्या अप मेल,एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे,विक्रोळी दरम्यान ६व्या मार्गावरून वळविण्यात येतील.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी,बेलापूर, पनवेल कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला तसेच पनवेल वाशी विभागात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे, वाशी,नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम Railwayवर ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी (ता.१) चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गांवरून चालवल्या जातील. तसेच, काही अप आणि डाउन उपनगरीय सेवा रद्द राहतील. तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे,दादर पर्यंतच चालविण्यात येणार आहेत.



