Sports festival : दादरमधील ‘समर्थ’मध्ये रंगणार क्रीडा महोत्सव

तब्बल २००० शिबिरार्थी, २५० प्रशिक्षक आणि ४० मान्यवरांच्या उपस्थितीत ‘समर्थ’चा शताब्दी उत्तर जल्लोष

मुंबई –

दादरमधील क्रीडांगण पुन्हा एकदा जोश, जल्लोष आणि जिद्दीने थरारून जाणार आहे. श्री समर्थ व्यायाम मंदिरतर्फे आयोजित ५२ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर यंदा शताब्दी महोत्सवी परिपूर्ती वर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात साकारत आहे. दि. १७ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत रंगणारे हे शिबीर म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

हे भव्य शिबीर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, समर्थ क्रीडा भवनासमोरील क्रीडांगण, दादर येथे आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी ७ ते ८:३० आणि सायंकाळी ७ ते ८:३० अशी ठेवण्यात आली आहे. ५ वर्षांवरील कोणालाही या शिबिरात सहभागी होता येणार असून, क्रीडाप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

श्री समर्थ व्यायाम मंदिर voice of eastern
श्री समर्थ व्यायाम मंदिर

यंदाच्या शिबिरात तब्बल २००० शिबिरार्थींना प्रवेश देण्याचा मानस असून, त्यामध्ये सकाळी ८०० व सायंकाळी १२०० शिबिरार्थी सहभागी असतील. शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी किमान २५० प्रशिक्षित प्रशिक्षकांची फौज सज्ज असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे हे शिबीर म्हणजे ‘समर्थ’च्या संघटनक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरणार आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सोहळे

या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज होणारे भव्य सोहळे! १० दिवसांत दररोज ४ मान्यवर अतिथी अशा एकूण ४० नामवंत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजावतरण पार पडणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे शिबिरार्थींना प्रेरणेचा नवा स्रोत मिळणार आहे.

पौष्टिक खुराक व दर्जेदार सुविधा

शिबिरातील सर्व २००० शिबिरार्थी आणि मानसेवी प्रशिक्षकांना पौष्टिक खुराक देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शारीरिक विकासाबरोबरच आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम ‘समर्थ’ची खास ओळख ठरला आहे.

Sports Festival : सहभागाची संधी

शताब्दी महोत्सवी परिपूर्ती वर्षाच्या निमित्ताने या भव्य शिबिरासाठी पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. कमी शुल्कात दर्जेदार प्रशिक्षण आणि उत्कृष्ट सुविधा मिळत असल्याने क्रीडाप्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे असे ‘पद्मश्री’ व ‘शिवछत्रपती पुरस्कार’ यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित व श्री समर्थ व्यायाम मंदिरचे प्र. कार्यवाह उदय देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

‘समर्थ’ची परंपरा, उत्कर्ष आणि प्रेरणा

५२ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर हे केवळ प्रशिक्षण शिबीर नसून, क्रीडा संस्कारांची जपणूक करणारे एक प्रेरणास्थान आहे. शताब्दी महोत्सवी परिपूर्ती वर्षाच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळणार आहे. दादरचे मैदान पुन्हा एकदा घोषणांनी दुमदुमणार आहे – “खेळा, जिंका आणि समर्थ बना!”

हेही वाचा : Schools Start : विदर्भासह राज्यातील शाळा यंदा १५ जूनपासून

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *