Menopause Treatment Center : देशातील पहिले शासकीय केंद्र महाराष्ट्रात सुरू

महिलांच्या आरोग्यच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई :

राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे, तसेच रजोनिवृत्ती कालावधीत महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व संप्रेरक (हार्मोन्स) बदलांवर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन मिळावे यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्राने देशात प्रथमच शासकीय रुग्णालये व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करून राष्ट्रीय पातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर voice of eastern
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातील एक संवेदनशील व महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात महिलांमध्ये संप्रेरकांमध्ये बदल, हाडांचे विकार, झोपेच्या तक्रारी, हृदयविकाराचा धोका तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. मात्र महिलांच्या या महत्त्वाच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. ही बाब लक्षात घेत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्रा’मध्ये महिलांना एकाच ठिकाणी सर्वांगीण उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, संप्रेरक तपासण्या, हाडे व हृदय आरोग्य मूल्यांकन, तसेच आवश्यक उपचार, औषधोपचार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शनाचा समावेश आहे.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील विविध भागांतील महिलांनी या ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्रा’ला चांगला प्रतिसाद देत आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये या केंद्राला मोठ्या प्रमाणात महिलांनी पसंती दिली आहे. देशात प्रथमच राज्यस्तरावर अशा स्वरूपाचे ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले असून, अन्य राज्यांसाठीही हा उपक्रम मार्गदर्शक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Menopause महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा

रजोनिवृत्ती हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज असते. प्रत्येक महिलेला योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच ‘रजोनिवृत्ती उपचार केंद्र’ सुरू करण्यात आले आहेत. यामुळे महिलांचे आरोग्य सक्षम होण्याबरोबरच कुटुंब, समाज आणि राज्य अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : Metro one app : साडे तीन महिन्यात २७ लाख ८२ हजार तिकीट बुकिंग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *