Nursing College : १७ टक्के खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा कमी प्रवेश

मुंबई :

नर्सिंग शिक्षण क्षेत्रात चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून राज्यातील अनेक खासगी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये अत्यल्प प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २७७ खासगी नर्सिंग महाविद्यालयांपैकी ४७ महाविद्यालयांमध्ये शून्य ते दहा विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. यामध्ये सात महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याची बाब विशेष ठरली आहे.

राज्यात यंदा १७ सरकारी आणि २७७ खासगी अशा एकूण २९४ नर्सिंग महाविद्यालयांमध्ये १६,५३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. सरकारी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध १,१८० जागांपैकी १,१७४ जागांवर प्रवेश झाले असून केवळ सहा जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र खासगी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये चित्र वेगळे असून १५,३५० जागांपैकी फक्त ९,७८३ जागांवर प्रवेश झाले आहेत. परिणामी ५,५६७ जागा रिक्त राहिल्या असून, राज्यभरात एकूण ५,५७३ नर्सिंगच्या जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत.

नर्सिंग शिक्षण voice of eastern
नर्सिंग शिक्षण

अत्यल्प प्रवेश झालेल्या ४७ महाविद्यालयांमध्ये सात महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश झाले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांचा समावेश असून यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महाविद्यालयात एकही प्रवेश झालेला नाही. तसेच दहा विद्यार्थ्यांपर्यंतच प्रवेश झालेल्या महाविद्यालयांची संख्याही सात इतकी आहे.

जिल्हानिहाय पाहता, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक सात महाविद्यालयांमध्ये दहा पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. त्यानंतर अहिल्यानगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. पुणे, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महाविद्यालयात अत्यल्प प्रवेश झाले असून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन महाविद्यालयांचा या यादीत समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक Nursing महाविद्यालयांमध्ये कमी प्रवेश

विभागनिहाय आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक १६ महाविद्यालयांमध्ये कमी प्रवेश झाले आहेत. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील १२ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अत्यल्प असून त्यात बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, जालना आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील आठ, तर विदर्भातील नऊ महाविद्यालयांमध्येही कमी प्रवेश झाले आहेत.

नर्सिंग महाविद्यालयांमध्ये या स्थितीमागची कारणे काय आहेत, संबंधित महाविद्यालयांमध्ये पुरेसा शिक्षकवर्ग, आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Trilingual policy : त्रिभाषा धोरण समितीस 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *