CET CELL : समाज माध्यमांवर चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कारवाई
सीईटी कक्षाचा इशारा; एका युट्यूबरला नोटीस
मुंबई :
सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा, परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षेचे निकाल व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाबाबत अनेकदा दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती किंवा दावे समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) प्रतिमेस बाधा निर्माण होते. त्यामुळे एक्स, फेसबुक, यूट्यूब व व्हॉट्सॲप या समाज माध्यमांवर चुकीची व दिशाभू करणारी माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.
सीईटी कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र मागील काही दिवसांमध्ये या प्रवेश परीक्षा व प्रक्रियेबाबत विविध समाज माध्यमांवर चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी सीईटी कक्षाने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची, दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या समाज माध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सीईटी कक्षाने स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ची स्थापन केली आहे. या टास्क फोर्सने ‘डिजिटल मास्टर’ या यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. ‘डिजिटल मास्टर’ या यूट्यूब चॅनेलवर शिवा या युट्यूबरने एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षेच्या तारखा, त्याच्या अर्ज नोंदणी करण्याच्या तारखा, निकालाच्या तारखा पॉडकास्ट करून जाहीर केल्या होत्या. यामुळे विद्यार्थी व पालकात संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे आल्या. सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. यामुळे ‘डिजिटल मास्टर’ या यूट्यूब चॅनेलला एक कायदेशीर नोटीस पाठविली. तसेच संबंधित चित्रफित यूट्यूबवरून तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले. तसेच ‘डिजिटल मास्टर’ या यूट्यूब चॅनेलवर यासंदर्भात स्पष्टीकरण प्रसारित करण्यात यावे व याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कायदेशीर नोटीसची प्रत गुगल इंडियाच्या दिल्ली व मुंबईच्या कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.
CET CELL : विद्यार्थी व पालकांना आवाहन
समाज माध्यमावर सीईटीच्या संबंधित काही चुकीची माहिती, पोस्ट, रिल, पॉडकास्ट, चित्रफिती व आक्षेपार्ह आढळल्यास तसेच परीक्षा केंद्र बदलून देण्याचा दावा करणे, पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे अशा प्रकारच्या समाज माध्यमावरील तक्रारी असतील तर
socialmedia.complaints@mahacet.org याच ईमेलवर पाठवून द्याव्यात. या तक्रारीची सीईटी कक्ष सत्यता पडताळून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सीईटी कक्षाकडून विद्यार्थी व पालकांना केली आहे.



