Metro 4 मार्गिकेचा स्लॅब कोसळला; मृताच्या वारसाला आर्थिक मदत
मुंबई :
मुलुंड अग्निशमन केंद्राजवळ वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेचा पॅरापेट (स्लॅब) आज दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला. या घटनेत जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी रामधन यादव या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत राज्य सरकार देईल, अशी घोषणा केली आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेले अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रो ४ मार्गिकेचे काम संथगतीने सुरु आहे. आज दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील मेट्रो मार्गिकेच्या पियर पी १९६ जवळ एक घटना घडली. मेट्रो मार्गिकेच्या पॅरापेटचा (स्लॅब) एक भाग उंचीवरून एका ऑटो रिक्षा आणि स्कोडा चारचाकी वाहनावर पडला. घटनेची माहिती मिळताच बीएमसी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेच्या ठिकाणचा रस्ता बंद करून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली.

या घटनेत चार प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या उपासनी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी रामधन यादव या पुरुषाचा मृत्यू झाला. तर राजकुमार यादव (वय ४५) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच महेंद्र यादव (वय ४२) आणि दीपा रुहीया (वय ४०) यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च एमएमआरडीए करणार आहे. तर एमएमआरडीएच्या धोरणानुसार मृत्यूच्या कुटूंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्यानुसार एमएमआरडीएने तपासासाठी संचालक (प्रकल्प) बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती बांधकाम पद्धती, गुणवत्ता नियंत्रण प्रोटोकॉल आदींची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रोचे काम प्राथमिक निष्कर्ष येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
Metro कंत्राटदाराला ५ कोटींचा तर, सल्लागार कंपन्यांना एक कोटींचा दंड
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेचा पॅरापेट (स्लॅब) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदार आरएजेव्ही मिलान इन्फ्रा कंपनीला ५ कोटी रुपयांचा दंड केला आहे. तर सल्लागार कंपनीकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.स्लॅब दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एमएमआरडीएने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच घटनेची प्रथमदर्शनी जबाबदारी म्हणून कंत्राटदार आरएजेव्ही मिलान इन्फ्रा कंपनीला ५ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तर डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग, हिल इंटरनॅशनल इंक आणि लुई बर्जर कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संयुक्त समूह सल्लागारांना १ कोटी रुपयांचा दंड केला आहे.
हेही वाचा : NCET 2026 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी
घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संबंधित एजन्सींवर आर्थिक दंड आकारण्यात आला असून चौकशीच्या अंतिम निष्कर्षांच्या आधारे पुढील कठोर कारवाई केली जाईल. एमएमआरडीए सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि सर्वोच्च सुरक्षा मानकांसाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे, एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.



