आधार-अपार प्रमाणीकरणाशिवाय आता CET नोंदणी शक्य
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी आधार व अपार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे आधार-अपार प्रमाणीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनाही आता अर्ज नोंदणी करण्याची मुभा देण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करणे शक्य होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सीईटी कक्षाकडून आधार व अपार प्रमाणीकरण आवश्यक केले होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड व अपार आयडी आणि दहावी- बारावीच्या गुणपत्रिकेतील नावांमध्ये तफावत येत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ‘दैनिक लोकसत्ता’ने १९ जानेवारी रोजी ‘सीईटीच्या नोंदणीत अडथळे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावेळी सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सीईटीतील नोंदणीवर नावातील फरकाचा काेणताही परिणाम होणार नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांचा अर्ज अपात्र, नामंजूर किंवा बाद होणार नसल्याचे जाहीर केले होते.

मात्र नोंदणी प्रक्रियेदरम्यान नावातील तांत्रिक तफावत, बोटांचे ठसे व अन्य बायोमेट्रिक अडचणी, आधार प्रणातील त्रुटी अशा कारणांमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज अडकले. आधार व अपार प्रमाणीकरणाशिवाय अर्ज पूर्ण होत नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला. सीईटीची नोंदणी प्रक्रिया अखेर टप्प्यात असताना अर्जच पुढे जात नसल्याने विद्यार्थी प्रंचड तणावाखाली आले आहेत. मागील काही दिवसांमध्ये प्रमाणीकरणाबाबत सीईटी कक्षाकडे विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या.
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोयीमुळे अखेर सीईटी कक्षाला आधार व अपार प्रमाणीकरणाचा आपला हट्ट बाजूला ठेवावा लागला. नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण हीच पडताळणी पद्धत ठेवताना ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे आधार व अपार प्रमाणीकरण पूर्ण करणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना आधार व अपार प्रमाणीकरणाविना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना आधार व अपार प्रमाणीकरणाद्वारे सीईटी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य आहे, त्यांच्यासाठी आधार व अपार बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
आधारमधील तफावतीमुळे CET कक्षाकडून विद्यार्थिंनीची नोंदणी
सीईटी कक्षामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या एका विद्यार्थ्यिंनीकडे दोन वेगवेगळ्या नावाचे आधार कार्ड होते. त्यातील एका आधार कार्डवरील नाव तिच्या शालांत परीक्षेच्या गुणपत्रिकेवर होते. मात्र दोन वेगळ्या नावाने आधारकार्ड असल्याने अर्ज नाेंदणी करताना तिचे दोन्ही आधारकार्ड रद्द करण्यात आले. त्यामुळे तिला अर्ज नोंदणी करणे अशक्य झाले होते. तिने ही बाब सीईटी कक्षातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर तिच्या नोंदणीची व्यवस्था करत तिला नव्याने आधार कार्ड काढण्याची सूचना देण्यात आली.



