उद्योग क्षेत्रासाठी देशात पहिली ‘AI लिविंग लॅब’ सुरु
मुंबई :
राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणारा ‘एआय लिव्हिंग लॅब’ हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. उद्योग समूह तसेच लघु व मध्यम उद्योगांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी देशातील पहिल्यांदाच अशी सुविधा उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ येथे झाले. हा उपक्रम जर्मनीच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
उद्घाटन कार्यक्रमास जर्मनीच्या संसदीय राज्यमंत्री डॉ. बार्बेल कॉफ्लर, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉप हेलिर तसेच जीआयझेडचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ‘लिव्हिंग लॅब’ संदर्भातील विविध सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, भारताला प्राचीन काळापासून उद्योग आणि तंत्रज्ञानाची समृद्ध परंपरा लाभली आहे. स्वदेशी उद्योगांच्या बळावर भारताने जागतिक व्यापारात आपली ओळख निर्माण केली होती. आजही त्याच स्वावलंबी दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून उद्योगांना चालना देत आहेत. एआय लिव्हिंग लॅबसारखे उपक्रम देशाला तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रस्थानी नेतील आणि भारत ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बार्बेल कॉफ्लर यांनी आपल्या मनोगतात कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवजातीच्या भविष्यास आकार देणारी परिवर्तनकारी शक्ती असल्याचे नमूद केले. उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात एआयमुळे मोठे बदल घडत असून आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे नवकल्पनांना वेग मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी एआय ही एक नवी औद्योगिक क्रांती असल्याचे सांगितले. बदलत्या अर्थव्यवस्थेत एआय कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक ठरत असून तरुण पिढी यामध्ये मोठ्या संधी पाहत आहे, असे त्यांनी नमूद केले.
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ‘एआय लिव्हिंग लॅब’ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, उद्योग, विद्यापीठ आणि शासन यांना एकत्र आणून प्रत्यक्ष औद्योगिक समस्यांवर उपाय शोधण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर थेट काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योग तज्ञ यांच्या संयुक्त सहभागातून समस्यांचे विश्लेषण करून व्यवहार्य उपाय विकसित केले जातील.
हेही वाचा : एआय हे शिक्षण, Teacher, विद्यार्थ्यांना सक्षम करणारे माध्यम
या उपक्रमात जर्मनीतील लाइपझिग विद्यापीठ व इतर संस्थांचे सहकार्य लाभत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही औद्योगिक कंपन्यांनीही विद्यापीठासोबत सहकार्य करार केले आहेत. या माध्यमातून तंत्रज्ञान देवाणघेवाण, संशोधन आणि उद्योग समस्यांवर एआय-आधारित उपाययोजना विकसित करण्यास चालना मिळणार आहे. ‘एआय लिव्हिंग लॅब’मुळे राज्यातील उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळून कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीस नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



