MCA CET : अर्जात २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन दुरुस्तीची संधी

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षेसाठी सुरू असलेली नाेंदणी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) व व मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम. एचएमसीटी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली. एमसीएच्या प्रवेश परीक्षेसाठी ५५ हजार ५४२ तर एम. एचएमसीटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्या सुधारण्याची विद्यार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अर्जामध्ये ऑनलाईन दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सीईटी कक्षामार्फत एमसीए व एम. एचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश नोंदणीला ७ जानेवारी २०२६ पासून सुरुवात झाली होती. नोंदणीची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती. त्यानंतर १८ फेब्रुवारीपर्यंत पहिली आणि २३ फेब्रुवारीपर्यंत दुसरी व अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार यंदा एमसीए अभ्यासक्रमाला ५५ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी तर एम. एचएमसीटी अभ्यासक्रमासाठी ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची संधी त्यांना देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. अर्जामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही दुरुस्ती करता येणार असून, विद्यार्थ्यांना २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, स्वाक्षरी, लिंग यामध्ये दुरुस्ती व बदल करता येणार आहे.

हेही वाचा : Mumbai University : खेलो इंडिया स्पर्धेसाठी संघ ठरला पात्र

एमसीए या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ३० मार्च २०२६ रोजी तर एम. एचएमसीटी अभ्यासक्रमाची सीईटी २५ मार्च २०२६ रोजी होणार आहे. ही परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

MCA च्या गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी घटली

एमसीए सीईटी प्रवेश परीक्षेसाठी गतवर्षी ५६ हजार २५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७१५ विद्यार्थ्याची नोंदणी कमी झाली आहे. तर एम. एचएमसीटीच्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी गतवर्षी ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०२५ पेक्षा २५ विद्यार्थ्याची नोंदणी यावर्षी कमी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *