MHT-CET च्या अर्जात ७ मार्चदरम्यान ऑनलाईन दुरुस्ती सुविधा

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमधील महत्त्वाची असलेल्या एमएचटी सीईटीसाठी अर्ज नाेंदणी प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी संपली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ५ ते ७ मार्चपर्यंत आपल्या अर्जातील चुका दुरुस्त करता येणार आहेत. यावर्षी प्रथमच पीसीएम व पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग, एम प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एमएचटी सीईटी ही परीक्षा देणे आवश्यक असते. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू करण्यात आली. नोंदणीची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी होती. मात्र त्याला २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. दुसरी व अंतिम मुदतवाढ २४ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली. त्यानंतर विलंब शुल्कासह २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २७ फेब्रुवारी रोजी नोंदणीची मुदत संपली. यावर्षी प्रथमच पीसीएम व पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एमएचटी सीईटीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केली आहे. त्यापैकी काही विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठी सीईटी कक्षाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दुरुस्तीची सुविधा ५ ते ७ मार्चदरम्यान उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूह समाविष्ट करणे, दुसरी संधी समाविष्ट करणे आदी बाबींमध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

दोन्ही संधीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा

एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ११ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान होणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १० ते ११ मेदरम्यान होणार आहे.

Mht cet साठी ११ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

सीईटी कक्षाकडून राबविण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटीसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पहिल्या संधीसाठी ७ लाख ५५ हजार २९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर दुसऱ्या संधीसाठी ३ लाख ८७ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी प्रक्रियेमध्ये पीसीबी समूहापेक्षा पीसीएम समूहाला विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली आहे. पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीसाठी ४ लाख ७४ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर दोन्ही संधीसाठी २ लाख ८६ हजार ३२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीसाठी २ लाख ८० हजार ३७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दुसऱ्या संधीला १ लाख ०१ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

पीसीएमकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक

मागील वर्षीच्या प्रवेश नोंदणीच्या तुलनेत यंदा पीसीएम समूहासाठी जास्त नोंदणी झाली आहे. २०२५ च्या एमएचटी सीईटीवेळी पीसीएम समूहासाठी ४ लाख ६४ हजार २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यावर्षी ही नोंदणी पहिल्या संधीसाठी ४ लाख ७४ हजार ६५६ इतकी झाली आहे. ही वाढ १० हजार ३९४ ने जास्त आहे.

हेही वाचा : Skill Development : आदिवासी तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी ‘बिरसा’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *