MSRTC : भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांच्या घरावर मोर्चा काढू – श्रीरंग बरगे
अमरावती :
एसटीच्या अमरावती विभागात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम काही स्थानिक लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. यापूर्वी स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी देणाऱ्या अमरावती जिल्ह्याला ही बाब भूषणावह नसल्याचे सांगत, हा प्रकार थांबला नाही तर संबंधित लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अमरावतीमधील काँग्रेस भवनात झालेल्या एसटी कामगारांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
बरगे पुढे म्हणाले की, एसटीच्या अमरावती विभागात पास घोटाळा, तिकीट घोटाळा, मद्यपानाशी संबंधित प्रकार अशी अनेक प्रकरणे अलीकडच्या काळात उघड झाली आहेत. एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने काहीना दोषी ठरवले आहे. मात्र अशा भ्रष्टाचाराला अभय असणारे व पाठीशी घालणारे काही अधिकारी अजूनही याच जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. उलटपक्षी दुसरीकडे, एखाद्या वाहकाकडून दोन-पाच रुपयांची चूक झाली तरी त्यांना तात्काळ निलंबित केले जाते, बदली करण्यात येते, बडतर्फीची कारवाई केली जाते. किरकोळ अपघातात गाडीचा पत्रा जरी घासला गेला तरी चालकांकडून वसुली केली जाते, तर गाडी ब्रेकडाऊन झाल्यास यांत्रिकांनाही दोषी ठरवले जाते. परंतु लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा अधिकाऱ्यांवर बदलीसारखी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तरी ती रोखण्याचे काम काही स्थानिक लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
MSRTC आर्थिक कचाट्यात
आज अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक कचाट्यात सापडले आहे. महामंडळाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेतली आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी त्यांच्या भूमिकेलाच छेद देण्याचे काम करीत असल्याचेही बरगे यांनी सांगितले.
यापुढे तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करू नये, असे आवाहनही बरगे यांनी यावेळी केले. या मेळाव्याला शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बबलू शेखावत, संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप मुळे, कार्याध्यक्ष प्रवीण नरोडे, सचिव जयंत मुळे, ज्येष्ठ नेते दादाराव डोंगरे, योगेश कोकाटे, सागर गावंडे, प्रवीण चरपे, शिवदास स्वर्गे, पंकज देशमुख, धीरज गोगटे, मनीष तिवारी, रणजीत तायडे, गजानन लव्हाळे आदी पदाधिकारी व एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इतर संघटना मधील 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कर्मचारी काँग्रेस या संघटनेत प्रवेश केला.



