MUHS : आरोग्य विद्यापीठाच्या लेखी परीक्षा २३ मार्चपासून
राज्यभर १७५ केंद्रांवर ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा
मुंबई :
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ( MUHS ) हिवाळी २०२५ टप्पा ४ मधील पदवी, पदव्युत्तर तसेच विद्यापीठ संलग्नित विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांना २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या परीक्षा १० एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहेत. राज्यभरातील एकूण १७५ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेला सुमारे ४३ हजार ९२८ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आली.
पदवी स्तरावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) प्रथम ते चतुर्थ वर्षांच्या विविध सत्रांच्या परीक्षांबरोबरच बीएएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या आयुष अभ्यासक्रमांच्या विविध वर्षांच्या परीक्षा, तसेच बीएससी नर्सिंगच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. तसेच पदव्युत्तर स्तरावर आयुर्वेद आणि युनानी शाखेतील एमडी आणि एमएसच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहेत. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या इतर अभ्यासक्रमांमध्ये एमबीए (प्रथम सत्र) आणि एमएस्सी फार्मास्युटीकल मेडिसिन (प्रथम सत्र) यांच्या परीक्षाही होणार आहेत. या परीक्षा १० एप्रिलपर्यंत चालणार आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या होणाऱ्या या परीक्षा राज्यभरातून जवळपास ४३ हजार ९२८ विद्यार्थी देणार आहेत. या परीक्षा राज्यातील एकूण १७५ केंद्रांवर हाेणार आहेत. सकाळच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ वाजता, तर दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
MUHS च्या परीक्षा प्रक्रियेमध्ये ऑनलाईन प्रणालीचा वापर कायम
परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाइन प्रणालीचा वापर कायम ठेवला आहे. या प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी थेट संबंधित केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत. तसेच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांची तपासणी करण्याची पद्धतही यापूर्वीप्रमाणेच राबविण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
वेळेचे काटेकोर पालन करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
दरम्यान, सर्व परीक्षार्थींनी वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ वाजता, तर दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वेळेत उपस्थित न राहिल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असेही विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे.


