TET EXAM २१ जून रोजी; अर्ज भरण्यास २७ मार्चपासून सुरुवात

मुंबई :

राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक मानली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ ही २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी २७ मार्चपासून सुरूवात होणार आहे. परीक्षेसंदर्भातील वेळापत्रकही परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद voice of eastern
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनुसार टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर आता परिषदेने पुढील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २१ जून रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना २७ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत भरावे लागणार असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच अर्जाची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ९ जून ते २१ जून या कालावधीत ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

TET EXAM दोन सत्रांमध्ये हाेणार परीक्षा

टीईटी परीक्षा २१ जून रोजी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये पेपर क्रमांक एक (प्राथमिक स्तर) सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होईल, तर पेपर क्रमांक दोन (उच्च प्राथमिक स्तर) दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. हे वेळापत्रक अधिसूचनेतील तक्त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पेपर १ आणि पेपर २ दोन्ही देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकाच अर्जात दोन्ही स्तराचा पर्याय निवडावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

अर्ज काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन

अर्ज करताना उमेदवारांनी दहावी, बारावी तसेच शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची माहिती मूळ प्रमाणपत्रांनुसार अचूक भरावी. स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र आणि स्वयंघोषणा पत्र अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार असून शुल्क भरल्यानंतरच अर्ज अंतिम मानला जाणार आहे. परीक्षेनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. तसेच पूर्वीच्या टीईटी परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभागी उमेदवारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आल्याची माहितीही परिषदेकडून देण्यात आली आहे. परीक्षेविषयी सविस्तर माहिती, अभ्यासक्रम, पात्रता आणि इतर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्या काळजीपूर्वक वाचाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

TET EXAM ला वाढता प्रतिसाद

नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेला गतवर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला हेता. नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत दोन्ही पेपर मिळून एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवार बसले होते. यापैकी केवळ ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले होते. एकूण निकाल ११.२८ टक्के इतका कमी लागला होता. यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये अनेक उमेदवार अपात्र राहिल्याने ही परीक्षा महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : science exhibition : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *