राज्यातील अवैध वाहतूक अनावर; ST ला कोट्यवधींचा फटका

एसटी अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप

मुंबई : 

राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला हादरा देणारी अवैध वाहतूक अजूनही बेधडक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एसटी आणि आर.टी.ओ. विभागाने संयुक्त मोहीम राबवली नाही, तर सुरू असलेल्या कारवाया केवळ दिखाऊ ठरतील, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

MSRTC bus
एसटी

अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी एसटी आणि आर.टी.ओ. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, स्थानिक स्तरावर या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा पातळीवरील एसटी अधिकारी आर.टी.ओ.ने केलेल्या कारवाईची आकडेवारी स्वतःच्या नावावर मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर करीत असून त्यामुळे ही कारवाई केवळ मर्यादित राहिल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात आजही हजारो अवैध छोटी वाहने तसेच काही परवानाधारक वाहनेही नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत आहेत. परवानगी नसताना सुरू असलेल्या टप्पे वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील सुमारे ३५ टक्के मार्ग या अवैध वाहतुकीमुळे प्रभावित झाले असल्याचा दावाही बरगे यांनी केला आहे.

ST ला १२ हजार कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्षात एसटी महामंडळाला सुमारे १२००० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळणार असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. फक्त ७५० कोटी रुपयांची तूट होईल असा अंदाज आहे. मात्र, या ३५ टक्के प्रभावित मार्गांवर काटेकोर नियोजन करून आणि संयुक्त कारवाई केली तर उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाच्या जोरावर एसटी महामंडळाला नफ्यात आणणे शक्य असल्याचा विश्वासही बरगे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : TET EXAM २१ जून रोजी; अर्ज भरण्यास २७ मार्चपासून सुरुवात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *