Mumbai University : आरटी-पीसीआर व प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी प्रशिक्षणाची सुरुवात

राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचा कौशल्यविकास उपक्रम; विद्यार्थी आणि संशोधकांना उद्योगसिद्ध प्रशिक्षणाची संधी

मुंबई : 

जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य संशोधन क्षेत्रात वाढत्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने आरटी-पीसीआर व प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रज्ञानावरील दोन आठवड्यांचा ऑन-जॉब ट्रेनिंग (ओजेटी ) कार्यक्रम सुरू केला आहे. जीव विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा ४ क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आरटी-पीसीआर, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स, फ्लुरोसन्स इमेजिंग, ऑटोमेटेड लॅबोरेटरी सिस्टिम्स यांसारख्या अत्याधुनिक प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. संशोधन संस्था, रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि जैवतंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख या माध्यमातून होणार आहे.

मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन उपक्रम सुरू

जैवतंत्रज्ञान उद्योग, फार्मास्युटिकल कंपन्या, क्लिनिकल रिसर्च संस्था, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि शैक्षणिक संशोधन केंद्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा कौशल्ये, संशोधन क्षमता आणि आधुनिक तांत्रिक ज्ञान प्रदान करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी voice of eastern
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी

Mumbai University : संशोधनवृत्ती क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अनुभवाधारित शिक्षण, बहुविषयक अध्ययन आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आधुनिक शिक्षण हे केवळ सैद्धांतिक मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग आणि उद्योगसापेक्ष कौशल्ये देणारे असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रम क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

पहिली तुकडी १८ ते ३० मेदरम्यान

या कार्यक्रमाची पहिली तुकडी १८ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांकडून आणि संशोधकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्र, मुंबई विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन या केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत