Cet Result : सीईटीचे निकाल या आठवड्यामध्ये जाहीर होणार
मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) घेण्यात आलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा २० मे राेजी संपत आहे. त्यामुळे परीक्षांचे निकाल कधी लागणार अशी उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र त्यांची ही उत्सुकता लवकरच संपुष्टात येणार आहे. या आठवड्याच्या अखेरीसपासून सीईटीचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

एमएचटी सीईटी अंतर्गत असलेल्या पीसीएम समूहाची दुसऱ्या संधीची परीक्षा ही अखेरची परीक्षा असणार आहे. ही परीक्षा २० मे राेजी संपत आहे. त्यामुळे आता निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डाेळे लागले आहेत. पीसीएम समूहाची परीक्षा संपताच सीईटी कक्षाकडून निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी किंवा आठवड्याच्या अखेरीस सीईटी कक्षाकडून साधारणपणे चार अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
चार अभ्यासक्रमांच्या CET RESULT होणार जाहीर
सीईटी कक्षाने घेतलेल्या परीक्षांमधील प्रश्नांवर किंवा उत्तरावर आक्षेप नाेंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार अनेक अभ्यासक्रमांच्या प्रश्न व उत्तरांवर आक्षेप नाेंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झालीआहे. काही अभ्यासक्रमांच्या प्रश्न व उत्तरांवर विद्यार्थ्यांकडून काेणतेही आक्षेप नाेंदविण्यात आले नाही किंवा तीन ते चार आक्षेप नाेंदविण्यात आले. यावर तज्ज्ञ समितीकडून तातडीने निर्णय घेत हे आक्षेप मार्गी लावण्यात आले. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे निकाल लावण्याची तयारी सीईटी कक्षाकडून पूर्ण करण्यात येत आहे. निकाल लागण्याची शक्यता असलेल्या चार अभ्यासक्रमांच्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया येत्या दाेन ते तीन दिवसांत पूर्ण हाेताच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल गुरूवारी किंवा आठवड्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा : SNDT University : विद्यार्थींनींना देणार शेती, पर्यावरणाचे धडे
निकाल जाहीर करण्यात येणाऱ्या या चार अभ्यासक्रमांच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकत्रितरित्या जवळपास १२ हजार इतकी आहे.



