CET : सीईटी २०२६-२७ च्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीस सुरुवात
३ वर्षीय विधी, बीपीएड व एमपीएडच्या प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम मुदत
मुंबई :
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) केंद्रीभूत (कॅप) प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे. उच्च शिक्षणाअंतर्गत असलेल्या ३ वर्षीय विधी, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड ) व मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड) या तीन अभ्यासक्रमाच्या नोंदणीस सुरुवात झाली. या तीन अभ्यासक्रमासाठी ३० जूनपर्यंत नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. केंद्रीभूत प्रवेशासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

३ वर्षीय विधीची सीईटी १ व २ एप्रिल रोजी घेण्यात आली. या परीक्षेला ६९ हजार ४७३ विद्यार्थी बसले होते. बीपीएडची सीईटी ४ एप्रिल रोजी घेण्यात आली. ही सीईटी ५ हजार ४० विद्यार्थ्यांनी दिली. तर एमपीएडची सीईटी २४ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली. ही सीईटी २ हजार १४३ विद्यार्थ्यांनी दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाच्या सीईटीचे निकाल २७ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले. अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
CET : आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा
विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करताना पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र व आपल्या स्वाक्षरीची प्रतिमा दिलेल्या निश्चित आकारात जेपीजी किंवा जेपीईजी स्वरुपात स्कॅन करावी. तसेच या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रे, याची सविस्तर यादी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून निश्चित आकारात
पीडीएफ करून ऑनलाईन नोंदणी करताना अपलोड करण्यात यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.



