Tukaram mundhe : मुंबईमध्ये बेकायदा सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांचे पेव
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढें यांनी १ कोटी ५३ लाखांचा माल केला जप्त
मुंबई :
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट व सातार येथील बेकायदा सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल १ कोटी ५२ लाख ९७ हजार ८३२ रुपये किमतीचा बेकायदेशीर सौंदर्य प्रसाधनांचा साठा आणि उत्पादन यंत्रसामुग्री जप्त केली.

सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील विनापरवाना आणि चुकीचे लेबल लावलेल्या सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादक आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी अंधेरी पूर्व येथील घासवाला कंपाउंडमधील मेसर्स क्रिया इंटरप्रायजेस कंपनीवर छापा घातला. या तपासणीदरम्यान मुलांच्या केसांची व त्वचेची काळजी घेणारी पेगा पिग, शॅम्पू, लोशन, पावडर, सनस्क्रीन आणि पुरुषांसाठी असलेली सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी साठवलेली आढळली. या उत्पादनांच्या वेष्टनावर अस्तित्वात नसलेल्या उत्पादक संस्थेचा पत्ता नमूद होता. तसेच उत्पादनांवर बॅच नंबर, उत्पादन दिनांक व मुदतबाह्य दिनांक नमूद नसल्याने ही उत्पादने प्रथमदर्शनी चुकीचे लेबल लावलेले असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत सुमारे २९ लाख ८४ हजार ४३९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
Tukaram mundhe : भिवंडीमध्येही कारवाई
भिवंडीत केलेल्या कारवाईमध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधने उत्पादन कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आले. भिवंडीतील माणकोली दापोडे रोडवरील हरिहर कॉम्प्लेक्समधील मे. सिग्मा लाईफस्टाईल प्रा. लि. या विनापरवाना कारखान्यावर १५ जून २०२६ रोजी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये कंपनीच्या मालकाकडे कोणताही वैध उत्पादन परवाना नसल्याचे आढळले. कारखान्यावर कोणताही नामफलक नव्हता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी उत्पादनांवर ‘सल्फेट मुक्त’, ‘पॅराबेन मुक्त’ असा मजकूर छापलेला होता. तसेच तयार उत्पादनांवर अंधेरी येथील बनावट पत्ता नमुद करण्यात आला होता. बॉक्सवर बॅच नंबर किंवा कोणतीही कायदेशीर माहिती नव्हती. तसेच कारखान्यात कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा किंवा चाचणी अभिलेखा आढळला नाही.
या कारवाईत क्रीम फिलिंग मशिन, श्रींक रॅपिंग मशिन, लेबलिंग मशिन, ऑटोमॅटिक पावडर फिलिंग मशिन, एअर कॉम्प्रेसर, वजन काटे आणि जनरेटर यासह कच्चा व पक्का माल जप्त करून कारखाना सील करण्यात आला. या कारखान्यातून १ कोटी २३ लाख १३ हजार ३९३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मे. सिग्मा लाइफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकांनी आवश्यक उत्पादन परवाना न घेता उत्पादनांवर अंधेरी येथील पत्ता छापून ग्राहकांची दिशाभूल केल्यामुळे नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य विनापरवाना व भ्रामक सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन आणि विक्रीविरुद्ध राज्यव्यापी विशेष मोहीम राबवत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा ऑनलाईन विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन



