IIRF ranking : आयआयआरएफमध्ये जे.जे. रुग्णालय देशात १८ व्या तर राज्यात पहिल्या स्थानावर
मुंबई :
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कने (आंतरराष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा – आयआयआरएफ) देशातील २०२६ मधील वैद्यकीय महाविद्यालयांची मानांकने जाहीर केली आहेत. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय संलग्न जे.जे. रुग्णालयाने १८ वे स्थान तर महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच मुंबईतील सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय संलग्न केईएम रुग्णालयाने ३३ वा क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पहिल्या १०० महाविद्यालयांमध्ये राज्यातील ११ महाविद्यालयांचा समावेश आहे. या ११ महाविद्यालयांपैकी आठ महाविद्यालये राज्य सरकारची आहेत.

नवी दिल्लीतील एम्सने ९५३.५२ गुण मिळवत देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था होण्याची मान कायम ठेवला आहे. त्यानंतर मद्रास वैद्यकीय महाविद्यालयाने ९५२.६७ गुणांसह दुसरे तर पुद्दुचेरीमधील जेआयपीएमईआर या संस्थेने ९५१.७५ गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. आयआयआरएफने जाहीर केलेल्या या क्रमवारीमध्ये पहिल्या ५० महाविद्यालयांमध्ये राज्यातील पाच तर १०० महाविद्यालयांच्या यादीमध्ये ११ महाविद्यालयांना स्थान मिळाले आहे. यामध्ये ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाने ९२९.२७ गुणांसह देशात १८ स्थान, पश्चिम विभागामध्ये दुसरे आणि राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जे.जे. रुग्णालयाला अध्यापन-अध्ययन साधने आणि अध्यापनशास्त्र या गटामध्ये १५७.७० गुण, संशोधनाचे परिणाम (प्रमाण, उत्पन्न आणि प्रतिष्ठा) या गटामध्ये १५७.६७ गुण, नाविन्यपूर्ण वैद्यकीय पायाभूत सुविधा या गटामध्ये १५२.५८, सामाजिक समावेश या गटामध्ये १५५.९५, भविष्याभिमुखता या गटामध्ये १५३.०३ आणि बाह्य दृष्टिकोन या गटामध्ये १५०.४५ गुण मिळाले आहेत. त्यानंतर नागपूरच्या एम्स या संस्थेने ९१४.८८ गुण मिळवत राज्यामध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच मुंबई महत्त्वाचे रुग्णालय असलेले मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय संलग्न केईएम रुग्णालयाने ९०६.९९ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जे.जे. रुग्णालय, केईएम रुग्णालयाप्रमाणे मुंबईतील टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालयानेही (नायर रुग्णालय) पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे.
IIRF : उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी प्रकाशित करणारी भारतीय संस्था
आयआयआरएफ ही उच्च शिक्षण संस्थांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणारी भारतीय संस्था आहे. ही संस्था एकूण कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी अध्यापन, अध्ययन संसाधने, संशोधनाचे निष्कर्ष, उद्योग क्षेत्राशी समन्वय, प्लेसमेंटमधील कामगिरी, भविष्याभिमुखता आणि बाह्य दृष्टिकोन यांसारख्या विविध निकषांचा आधार घेते.
पहिल्या १०० मध्ये आलेली राज्यातील महाविद्यालये
ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय (१८), एम्स, नागपूर (२८), सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय (३३), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – नागपूर (३७), औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय (४९), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-मिरज (७५), वैश्यपायन मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर (७६), आर्म्ड फोर्स वैद्यकीय महाविद्यालय-पुणे (८१), बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय (८४), टोपीवाला नॅशनल वैद्यकीय महाविद्यालय (नायर रुग्णालय) (८७), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-नागपूर (९३) या महाविद्यालयांना स्थान मिळवले.
IIRF : पुढील वर्षी पाहिल्या १० मध्ये येणार – डॉ. भंडारवार
आयआयआरएफ क्रमवारीसाठी यंदा आम्ही प्रथमच अर्ज केला होता. त्यामुळे आम्हाला मिळालेला क्रमांक हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. पुढील वर्षी आवश्यक माहिती अधिक शिस्तबद्ध पद्धतीने संकलित करण्यात येईल. जेणेकरून क्रमवारीमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत होईल. पुढील वर्षी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय हे देशातील पहिल्या १० महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवले, अशी आशा जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी व्यक्त केली.



