Institute-level round : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या निरीक्षकाची नियुक्ती होणार
प्रवेश प्रक्रियाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई
मुंबई :
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या फेऱ्या सुरू आहेत. या प्रवेशाच्या फेऱ्या संपल्यानंतर संस्थास्तरीय प्रवेशाची फेरी सुरू होणार आहे. हि संस्थात्मक फेरी पारदर्शक होण्यासाठी सीईटी कक्षाने काही उपाययोजना केल्या आहेत. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाने संस्था, विद्यार्थी व पालकांसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
काही निवडक खाजगी महाविद्यालयांवर निरीक्षकाची नियुक्ती होणार आहे. तसेच या प्रवेश प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्या संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांनी मध्यस्थ किंवा खाजगी समुपदेशकांच्या प्रलोभनांना बळी पडू नये तसेच सोशल मीडियाद्वारे दिशाभूल माहितीपासून सावध रहावे, त्याऐवजी विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनासाठी सीईटी कक्षाच्या विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियामध्ये सर्व सहभागी संस्था, उमेदवार व पालकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, संस्थात्मक कोटा (Management Quota) आणि केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या (ACAP) जागांसाठीच्या संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती पुस्तिकेत (Information Brochure) दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे,
शैक्षणिक संस्थानी खालीलप्रमाणे कार्यवाही करा
महाविद्यालयांनी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसारच राबवणे बंधनकारक आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रकियेच्या सर्व फेऱ्या पूर्णपणे समाप्त झाल्यानंतरच संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जावी. सर्व जागांचे वाटप अर्जदार उमेदवारांच्या गुणवत्तेनुसारच (Inter-se Merit) केले जावे. उमेदवारांना प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे म्हणून महाविद्यालयांनी आपले प्रवेश नियम, कार्यपद्धती आणि माहिती पुस्तिका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवार थेट संबंधित महाविद्यालयात अर्ज करू शकतात किंवा त्यांच्या कॅप पोर्टल लॉगिनद्वारे संस्थास्तरीय पर्याय अर्ज (Option Form) सादर करू शकतात. यानंतर महाविद्यालयांनी थेट आलेले अर्ज आणि सीईटी कक्षाकडून मिळालेली उमेदवार यादी या दोन्हीचा विचार करून अधिकृत गुणवत्ता याद्या (Merit List) प्रवर्गानुसार तयार कराव्यात. सदर गुणवत्ता याद्या महाविद्यालयाच्या सूचना फलकावर आणि अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.
प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या (Attended) आणि प्रवेश निश्चित केलेल्या (Admitted) विद्यार्थी/पालक/नातेवाईकांची दैनंदिन नोंद प्रत्येक दिवशी प्रवेश प्रक्रियानंतर अहवाल सीईटी/प्रवेश नियामक प्राधिकरण यांस ई-मेलद्वारे पाठविण्यात यावे. विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर, संस्थेने तो प्रवेश तात्काळ अधिकृत कॅप पोर्टलवर नोंदवणे, तसेच सीईटी कक्षास कळविणे बंधनकारक आहे.
Institute-level round : निरीक्षकाची नियुक्ती
पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी, निवडक खाजगी महाविद्यालयांमधील संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक (Observer) म्हणून नियुक्ती केली जाईल. हे निरीक्षक कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी तयार करणे, शुल्क भरणा आणि जागा वाटप यावर देखरेख ठेवतील आणि दररोज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाकडे अनुपालन अहवाल सादर करतील.
Institute-level round : व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार
या व्यतिरिक्त, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया, विशेषतः कागदपत्र पडताळणी व जागा वाटप खोली/ हॉल सीसीटीव्ही देखरेखीखाली असावी.सदर सीसीटीव्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग विहित मुदतीसाठी सुरक्षित ठेवावे आणि ते तपासणी, ऑडिट किंवा तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकरणाने मागितल्यास, महाविद्यालयाने उपलब्ध करून द्यावे.
विद्यार्थी व पालकांना सूचना
उमेदवार आणि पालकांना कळविण्यात येते की, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वी जागा मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या एजंट, मध्यस्थ किंवा खाजगी समुपदेशकांच्या अवाजवी प्रलोभनांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. तसेच
सोशल मीडिया किंवा खाजगी लिंक्सद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा.
विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क
प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सीईटी कक्षाच्या राज्यातील ३६ जिल्हानिहाय विद्यार्थी सहाय्यता केंद्राशी संपर्क साधावा.
https://sac.maharashtracet.org/mhcet/submit-ticket या लिंकवर या विद्यार्थी सहाय्यता केंद्राची उपलब्ध होईल.
त्रुटी आढळल्यास कारवाई
संबंधित संस्थांनी माहिती पुस्तिकेतील (Information Brochure) नियमांचे तंतोतंत पालन करूनच प्रवेश प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दुर्लक्ष आढळल्यास, संबंधित संस्थेवर तात्काळ कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.



