Cama Hospital : ‘जनुकीय समुपदेशन विभाग’ १ एप्रिलपासून सुरू

मुंबई –

अनेक नागरिकांना जनुकीय आजार होत असतात मात्र त्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे त्याकडे दुर्लक्ष हाेते. ही बाब लक्षात घेता कामा व ऑल्ब्लेस रुग्णालयामध्ये जनुकीय विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागामार्फत जनुकीय (वंशपरंपरागत) आजारांचे निदान, समुपदेशन आणि व्यवस्थापन यावर विशेष भर दिला जाणार असून रुग्णांना अत्याधुनिक व तज्ज्ञ उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. हा विभाग १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

कामा रुग्णालय हे प्रसूतीसाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड, पालघर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात महिला प्रसूतीसाठी व विविध आजारांवरील उपचारासाठी येत असतात. यावेळी अनेक वंशपरंपरागत (जनुकीय) आजार हे नवजात बालकांना झाल्याचे आढळून येते. याबाबत नागरिकांमध्ये अज्ञान असल्याने जनुकीय आजारांवरील उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते. ही बाब लक्षात घेत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना जनुकीय आजारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कामा रुग्णालयामध्ये १ एप्रिलपासून नवीन जनुकीय विभाग सुरू करण्यात येत आहे.

कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे voice of eastern
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे

Cama Hospital मध्ये होणार जनुकीय विकारांचे

नव्या जनुकीय विभागामार्फत डाउन सिंड्रोम, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, टर्नर सिंड्रोम यांसारख्या विविध जनुकीय विकारांचे निदान करण्यात येणार आहे. तसेच गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या असामान्यतांचे लवकर निदान आणि नवजात शिशूंमधील जनुकीय विकार ओळखण्यातही हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या विभागातील ‘जनुकीय समुपदेशन’ ही सेवा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये व्यक्ती आणि कुटुंबांना वंशपरंपरागत आजारांविषयी मार्गदर्शन, पुढील पिढीकडे हे आजार जाण्याचा धोका समजावून सांगणे, तसेच वैद्यकीय व प्रजननासंदर्भातील योग्य निर्णय घेण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासोबतच कुटुंबांना मानसिक व भावनिक आधारही दिला जाणार आहे. या जनुकीय विभागाची जबाबदारी डॉ. शबाना बोराटे आणि डॉ. क्षमता किंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जनुकीय आजाराबाबत या डॉक्टरांच्या अनुभवाचा फायदा रुग्णांना मिळणार आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना आधुनिक निदान सुविधा तसेच पुराव्यावर आधारित उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

प्रगत जनुकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार

जनुकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला बळकटी मिळेल, आजारांचे लवकर निदान होईल आणि उपचारांचे परिणाम अधिक सुधारतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रगत जनुकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार असल्याचे डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

हेही वाचा :  Sion Hospital : शीव रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी विभागाला आग

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत