Banganga : बाणगंगेच्या सुरक्षेसाठी महापालिकेसोबत नागरिकांनी सहकार्य करावे – मंगलप्रभात लोढा

पर्यावरणपूरक पिंडदान आणि इतर विधी कार्यास नागरिकांना आवाहन, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली बाणगंगा तलावाची पाहणी

मुंबई :

वाळकेश्वर येथील ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेल्या पवित्र बाणगंगा तलावात दूषित पाण्यामुळे मृत पावलेल्या माशांचा खच आणि तलावाची पाहणी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. यावेळी, महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि स्थानिक नगरसेवक सन्नी सानप यांची उपस्थिती होती. तसेच, पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर तलावाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिले जाईल, असेही लोढा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वॉर्डमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाणगंगा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविली होती. पितृपक्षाच्या काळात बाणगंगा तलाव येथे पिंडदानासह विविध धार्मिक विधी करण्यासाठी हजारो नागरिक येतात. या विधींमध्ये वापरण्यात येणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, जलजीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तलाव परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

गेल्या गुरुवारी महापालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बाणगंगा तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पितृपक्षाच्या काळात वाढणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता, धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे साहित्य तलावात किंवा परिसरात टाकले जाऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत.

स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जलजीवनाचे संरक्षण यासाठी योग्य त्या उपाययोजना महापालिकेने त्वरित कराव्यात. १० कृत्रिम तलाव तयार केले जातील. तसेच दूषित पाण्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पंपांची संख्या वाढवली जाणार आहे. येत्या शनिवारी पितृपक्षाचा कालावधी संपणार असून, या काळात बाणगंगा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे पितृपक्षाच्या उर्वरित कालावधीत तसेच त्यानंतरही तलाव परिसरात स्वच्छता कायम राहावी, यासाठी महापालिकेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

 

Banganga : बाणगंगा तलावासाठी पर्यावरणपूरक पिंडदानाचे आवाहन

पिंडदान विधीदरम्यान वापरण्यात येणारे काही पदार्थ तलावाच्या पाण्यात सोडले जातात. हे पदार्थ जलजीवांनी सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाणगंगा तलावात धार्मिक परंपरा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदानाचे विधी करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाणगंगेचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे!

बाणगंगा तलावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. पितृपक्षाच्या काळात येथे मोठ्या संख्येने नागरिक धार्मिक विधींसाठी येतात. आपल्या पूर्वजांचे स्मरण आणि धार्मिक परंपरा जपत असतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. तलावातील जलजीवनाचे संरक्षण व्हावे, यासाठी नागरिकांनी पाण्यात तेल, तूप, गोड पदार्थ किंवा अन्य साहित्य टाकणे टाळावे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदान विधी करावेत. बाणगंगेचे पावित्र्य, स्वच्छता आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सहकार्य करावे.
— मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री

हेही वाचा : NCMC CARD : एनसीएमसी कार्ड कंत्राटदाराची सखोल चौकशी करा – श्रीरंग बरगे

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत